माजी आमदार पवार यांना कोरोनाची लागण
प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्हय़ात नवीन 331 रूग्ण वाढले तर 308 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 21 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 15 जणांचा आणि परजिल्हय़ातील सहा जणांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 264 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान माजी आमदार संभाजी पवार, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
महापालिका क्षेत्रात 261 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. एकाच दिवसात तब्बल 261 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 145 तर मिरज शहरात 116 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या कमी होती. पण बुधवारी मात्र त्यामध्ये एकदम दुप्पट वाढ झाली आहे. सध्या महापालिकेकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. तसेच सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले हायरिस्क नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत. नवीन रूग्ण हे खणभाग, विश्रामबाग, शंभरफुटी, हनुमाननगर, गावभाग, शामरावनगर, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर, जामवाडी, शिंदे मळा, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, हरीपूर रोड कोल्हापूर रोड या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत ही बुधवारी मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढले आहेत. बुधवारी एकाच दिवसांत तब्बल 116 रूग्ण वाढले आहेत. वाढलेले हे रूग्ण मिरजेतील विविध उपनगरातील आहेत. भारतनगर, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 466 झाली आहे.
ग्रामीण भागात 70 रूग्ण वाढले
बुधवारी ग्रामीण भागात मात्र महापालिकेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात तीन, जत तालुक्यात सात, कडेगाव तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात तीन, खानापूर तालुक्यात 14, मिरज तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात नऊ, शिराळा तालुक्यात एक, तासगाव तालुक्यात एक आणि वाळवा तालुक्यात 24 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 70 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 15 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 15 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील 62 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला मिरजेतील चार व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 50, 60 आणि 72 वर्षीय व्यक्तीचा तसेच 61 वर्षीय महिलेचा मिरज कोरोना रूग्णालयात येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तासगाव येथील 46 वर्षीय महिला आणि 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तालुक्यातील पुणदी येथील 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तर राजापूर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील पवळेवाडी येथील 68 वर्षीय व्यक्तीचा आणि आरळा येथील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आटपाडी येथील 90 वर्षीय व्यक्तीचा मेहता हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील इनामधामणी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. विटा येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 54 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 15 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 264 झाली आहे.
परजिल्हय़ातील सहा जणांचा मृत्यू
परजिल्हय़ातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 50 आणि 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला. शिरोळ येथील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर इचलकरंजी येथील 55 वर्षीय व्यक्ती आणि 56 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. सातारा जिल्हय़ातील कराड येथील 50 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 76 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
जिल्हय़ातील चार हजार 99 जणांची कोरोनावर मात
मंगळवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 308 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग आठव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या चार हजार 99 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
माजी आमदार पवार बाधित
माजी आमदार संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी सुपर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे पुत्र गौतम पवार यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. पलूस येथील तहसिलदार आणि गटविकास अधिकारी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यांचीही प्रकृती ठणठणीत आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 7401
बरे झालेले 4099
उपचारात 3038
मयत 264