नातेवाईकांकडून घातपाताचा संशय
पलुस / प्रतिनिधी
पलूस तालुक्यातील बांबवडे येथे पोल्ट्री मजूराचा मृतदेह विहरीत तरंगताना दिसून आला. हा प्रकार दुपारी पावनेतीनच्या सुमारास समजताच घटनास्थळी गर्दी झाली. राजू महादेव नाईक वय ३१रा. खटाव लिंगणूर ता. मिरज असे मयताचे नाव असून तो एका पोल्ट्रीमध्ये मजूरीचे काम करत होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी मी जेवायला बाहेर जातो असे पत्नी वर्षा नाईक हिला सांगून घराबाहेर पडला होता. घरी न परत आल्याने नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची वर्दी पलूस पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह सचिन संकपाळ यांच्या विहरीत आढळून आला.
राजू हा आत्महत्या करू शकत नाही त्याला पोहता येते, राजूची आत्महत्या नसून त्याचा घातपात झाला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. धुलवडी निमित्ताने बाहेर जेवायला गेल्यानंतर तो परत न आल्याने त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांचीही चौकशी व्हावी, आणि राजूच्या मृत्यूच्या मुळापर्यंत पोलिसांनी पोहचावे अशी मागणी मयताच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे.