आज जेष्ठा गौरीला पुरण पोळीचा नैवेद्य
प्रतिनिधी / सातारा
गणपती पाठोपाठ मंगळवारी गौरीचे ही सोनपावलांनी आगमन झाले आहे. आज बुधवार दि. 26 रोजी गौरीचे पूजन करण्यात येत आहे. घरात पुजेची तयारी सूरू आहे. सांयकाळी महिला हळदी-कुंक कार्यक्रम करत आहेत. मात्र कोरोनामुळे पाच महिलांना निमंत्रण देत आहेत.
आज ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पुजन होत आहे. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. सकाळपासून हे पदार्थ बनवण्यात महिला मग्न होत आहेत. घरा-घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवायला सुरूवात होत आहे.
गौरीच्या नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने बनवण्याची परंपरा आहे. मात्र महिला दोन प्रकारच्या भाज्या, गुळवणी, पुरणाची आमटी, पुरणपोळी, भजी, भात असे पदाथ बनवत आहेत. यासोबत घरात तर काही बाजारातून विकत आणलेले फराळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवणार आहेत. दरवर्षी महिला मोठया संख्येने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे गर्दी न करता पाच ते सात महिलांना हळदी-कुंक कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहेत.