कोरेगाव / वार्ताहर :
देऊर (ता. कोरेगाव) येथील विकास तुकाराम कदम यांच्या घरातून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री 27 तोळे सोने आणि 21 हजारांची रोकड लुटून नेली.
याबाबत माहिती अशी की, देऊर येथील रहिवासी विकास कदम यांच्या घरातील सर्वजण उन्हाळा असल्याने घराच्या स्लॅबवर झोपले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, अंगट्या, मोहनमाळ, चैन, लक्ष्मीहार, बदाम असे एकूण 27 तोळ्याचे दागिने तसेच 30 भार वजनाचे चांदीचे दागिने व 21 हजारांची रोकड चोरून नेली. आज सकाळी चोरीची बाब लक्षात येताच याची खबर विकास कदम यांनी वाठार पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि स्वप्नील घोंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी पाहणी केली. तसेच ठसेतंत्रन व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विकास कदम यांनी वाठार पोलिसात याबाबत फिर्याद दिली असून, अधिक तपास सपोनि स्वप्नील घोंगडे करीत आहेत.