प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील मध्यवर्ती एस. टी. बसस्थानकात रायगड जिल्ह्यातील एकाचा गारठून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ब्रिजमोहन भूतनाथ यादव (वय 25, रा. चाला मोहल्ला, ता. धरमजयगड, जि. रायगड), असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 26 रोजी सकाळी सातारा बसस्थानकावर ब्रिजमोहन यादव हा युवक फलाट क्रमांक 5 वर झोपलेला होता. पावणे नऊच्या सुमारास त्याला सुरक्षा रक्षकाने झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठला नाही. तो निपचित पडलेला होता. सुरक्षा रक्षकाने यादव याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. झोपेत गारठून त्याचा मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष वैद्यकीय सुत्रांनी काढला. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी खबर दिल्यानंतर घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात रजिस्टरला झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.