प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत असल्यापासून तापमान वाढीने चांगलाच जोर धरला आहे. एप्रिलमधील तापमान सर्वांना हैराण करुन सोडत असते. मात्र, तापमान वाढल्याने कोरोना वाढणार नाही, अशी धारणा असल्याने नागरिक वाढत्या तापमानाबद्दल काही बोलत नाही. मात्र, दिवसभर उन्हात असलेल्या पोलीस बांधवांना त्याचा फटका बसतो. रविवारी दुपारी पावसाने शिडकावा केला अन् ढगाळ वातावरण झाल्याने थोडासा दिलासा लाभला.
अवकाळी पावसाचे आगमन एप्रिल, मेमध्ये होतच असते. जिल्हय़ातील काही भागात विजांच्या कडाकडाटासह पाऊस झालेला आहे. मात्र सातारा शहर व परिसरात कडक उन्हाळा सुरु आहे. रविवारी वातावरणात बदल होत होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले. आता तो बरसणारच असे वाटत असताना पावसाने थोडासा शिडकावा करुन दडी मारली. एकीकडे लॉकडाऊनचे वातावरण असल्याने रस्त्यावर कोणीही नव्हते. मात्र या थोडय़ा शिडकाव्याने भर उन्हात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांना थोडसे हायसे वाटले.
सातारकरांनी लॉकडाऊन यशस्वी करण्याचा चंग बांधला असून या शिडकाव्याचा आनंद नागरिकांनी घरातच बसून लुटला. ढगाळ वातावरणात आपल्या घरातल्यांसमवेत राहण्याचा वेगळा अनुभवही यानिमित्ताने सातारकर अनुभवत आहेत. सध्या तरी लॉकडाऊन एवढाच पर्याय सुरु असल्याने पाऊस पडला तरी त्यात भिजण्याचा आनंद काही लुटता येणार नाही.