नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या सिंघू सीमारेषेनजीक शेतकरी आंदोलनात एका दलित युवकाची जमावाने हत्या केल्याप्रकणी अटक केलेल्या 3 आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हरियाणातील सोनिपत येथील न्यायालयाने हा आदेश दिला. नारायण सिंग, भगवंत सिंग आणि गोविंद प्रीत सिंग अशी आरोपींची नावे आहेत. 2 आरोपींना शुक्रवारी तर एका आरोपीला शनिवारी अटक झाली.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेले लखबीर सिंग यांच्यावर पंजाबच्या तरणतारण जिल्हय़ातील त्यांचे मूळ खेडे चीमा कलान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी कोणताही गावकरी उपस्थित नव्हता असे समजते. त्यांची हत्या शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली होती. लखबीर सिंग हे शीखांचा पवित्र ग्रंथ घेऊन जात असताना त्यांच्यावर निहंग शीख समाजाच्या व्यक्तींनी हल्ला केला असा आरोप आहे. त्यांनी पवित्र धर्मग्रंथाचा अवमान केला, असे आरोपींचे म्हणणे होते. आरोपी आणि लखबीर सिंग यांच्यात यावरुन मोठी वादावादी झाली आणि या भांडणाचे पर्यवसान त्यांच्या हत्येत झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.