सिंधुदुर्गातील कोरोना रुग्णांना दिलासा
तीन ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीनचे लोकार्पण
कुडाळ रोटरी, जनकल्याण समितीची सामाजिक बांधिलकी
भविष्यात आणखी दोन मशीन देण्याचा मानस
वार्ताहर / कुडाळ:
कोरोना महामारीत ज्या रुग्णांना सौम्य ते मध्यम लक्षणे आढळून येतात, त्यावेळी होम आयसोलेशनमध्ये श्वास घेताना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यास ऑक्सिजन सिलिंडरशिवाय हवेतील ऑक्सिजन अखंडितपणे पुरवठा करणाऱया तीन ‘ऑक्सिजन कॉन्सन्टेटर’ मशीनचे रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती (सिंधुदुर्ग) च्यावतीने जनसेवेसाठी लोकार्पण रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने, गुंतवणूक सल्लागार डी. बी. देसाई व रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर प्रणय तेली यांच्या हस्ते डॉ. नवांगुळ हॉस्पिटल (कुडाळ) येथे करण्यात आले. भविष्यात आणखी दोन ‘ऑक्सिजन कॉन्सन्टेटर’ मशीन उपलब्ध करून देण्याचा रोटरीचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची मर्यादित संख्या पाहता रुग्णांना कोल्हापूर, मुंबई, गोवा येथे हलविले जात असताना ऑक्सिजन पातळी कमी झाली, तर होणाऱया प्रवासात काहीजणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही समस्या लक्षात घेता रुग्णाला व्हेंटिलेटर मिळेपर्यंत हवेतील ऑक्सिजन अखंडितपणे व सहज पुरवठा करण्याचे काम करते.
मशीन हाताळायला सोपी
ही मशीन हाताळायला एकदम सोपी आहे. यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता नसल्याची माहिती जनकल्याण समिती (सिंधुदुर्ग) चे अध्यक्ष डॉ. योगेश नवांगुळ यांनी दिली, तर सद्यस्थितीत या मशीनची गरज ओळखून सर्वसामान्य कोविड रुग्णांना सहजपणे ऑक्सिजन पुरवठा करून प्राण वाचावेत आणि जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती यांच्या संयुक्त सहयोगातून या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यासाठी अभिजीत परब, रुपेश तेली, मयूर शिरसाट, संजय पिंगुळकर, मकरंद नाईक, एकनाथ पिंगुळकर, राजीव पवार, पेमेंद्र पोरे, डॉ. राजवर्धन देसाई, आनंद वेंगुर्लेकर, प्रमोद भोगटे, गीतांजली कांदळगावकर, स्वाती डुबळे आदी रोटरी सदस्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून श्री देव कुडाळेश्वर भजन मंडळाचे सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, विलास बापे तसेच गुंतवणूक सल्लागार डी. बी. देसाई यांनीही निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच एक मशीन रोटरी क्लब ऑफ कुडाळने, तर दोन मशीन जनकल्याण समितीने उपलब्ध करून दिल्या आहेत. पाच ऑक्सिमीटरही उपलब्ध करून दिले असल्याचे मदने यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे गजानन कांदळगावकर, शशिकांत चव्हाण, रवींद्र परब, सचिव अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, डी. के. परब, इनरव्हिलच्या गीतांजली कांदळगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र संचलित रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र (कुडाळ) चे अध्यक्ष महेश कुडाळकर, श्रीधर गोरे, समिरा प्रभू, राहूल जोशी, मुकुंद सप्रे, श्री देव कुडाळेश्वर भजन मंडळाचे सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, विलास बापे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कुडाळकर, तर आभार डॉ. नवांगुळ यांनी मानले.
डॉ. नवांगुळ हॉस्पिटल (कुडाळ) येथे उपलब्ध
या मशीन डॉ. नवांगुळ हॉस्पिटल (कुडाळ) येथे उपलब्ध आहेत. ज्यांना आवश्यक असेल, त्यांनी डॉ. नवांगुळ यांच्याशी संपर्क साधून ऑपरेटिंगची माहिती घेऊन मोफत वापरायची आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा आणून द्यायची आहे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समितीच्यावतीने करण्यात आले.