आयपीएलमध्ये पुन्हा एकदा बहरले ऋतु‘राज’! उत्थप्पाची लक्षवेधी फटकेबाजी,
दुबई / वृत्तसंस्था
धडाकेबाज फॉर्ममधील ऋतुराज गायकवाड (50 चेंडूत 70), बहरात परतलेला रॉबिन उत्थप्पा (44 चेंडूत 63) आणि पुन्हा एकदा फिनिशिंग टच देण्यात कमालीचे यशस्वी ठरलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (6 चेंडूत 18) नाबाद खेळीमुळे ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने आयपीएलच्या फायनलमध्ये जोरदार धडक मारली. येथे रंगलेल्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्लीने निर्धारित 20 षटकात 5 बाद 172 धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात चेन्नईने देखील तोडफोड फलंदाजी साकारत 19.4 षटकात विजय साकारला.
विजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना चेन्नईचा सलामीवीर प्लेसिस (1) स्वस्तात बाद झाला. शिवाय, मधल्या फळीत शार्दुल (0), अम्बाती रायुडू (1) आल्या पावली परतल्याने चेन्नईला आणखी धक्के बसले. पण, ऋतुराज-उत्थप्पाने चौफेर फटकेबाजी करत विजय आवाक्यात आणला आणि अंतिम टप्प्यात धोनीने स्फोटक फलंदाजीसह गतवैभवाची आठवण करुन देत स्पृहणीय विजय संपादन करुन दिला.
तत्पूर्वी, रिषभ पंत (35 चेंडूत नाबाद 51) व पृथ्वी शॉ (34 चेंडूत 60) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने पावणेदोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत जोरदार मजल मारली. कर्णधार रिषभ पंतला शिमरॉन हेतमेयरची (24 चेंडूत 37) देखील समयोचित साथ लाभली. या जोडीने चौफेर फटके लगावत 5 व्या गडय़ासाठी 83 धावांची महत्त्वाची भागीदारी साकारली.
रिषभ पंतने 3 चौकार, 2 षटकार फटकावले. यामुळे, दिल्लीला मधल्या फळीत स्पेशालिस्ट फलंदाज न खेळवण्याचा फारसा फटका जाणवला नाही. सलामीवीर पृथ्वी शॉची 34 चेंडूतील 60 धावांची खेळी अर्थातच लक्षवेधी ठरली. त्याने 7 चौकार व 3 षटकार वसूल केले. दिल्लीची 4 बाद 80 अशी स्थिती असताना पंत व हेतमेयर यांची जोडी जमली. हेतमेयरने मोईन अलीला पूलचा षटकार खेचला आणि नंतर ब्रेव्होला ऑफ साईडकडे चौकारासाठी पिटाळून लावले.
फिरकीपटूंना संयमाने सामोरे जाणाऱया पंतने नंतर शार्दुल ठाकुरला एकहाती ट्रेडमार्क षटकार खेचला. अर्धशतकी भागीदारी साकारल्यानंतर पंत-हेतमेयर जोडीने अधिक आक्रमणावर भर दिला. एकीकडे, हेतमेयरने जोश हॅझलवूडला (2-29) स्ट्रेट ड्राईव्ह लगावला तर पंतने डीप मिडविकेटच्या दिशेने आक्रमक फटका लगावत दिल्लीकरिता 150 धावांचा टप्पा सर करुन दिला.
शिखर धवन (7), श्रेयस अय्यर (1) पॉवर प्ले षटकात हॅझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाले तर अक्षर पटेलला (10) बढती दिल्याचा फारसा लाभ झाला नाही. चेन्नईतर्फे मोईन अलीने 4 षटकात 27 धावात 1 तर रविंद्र जडेजाने 3 षटकात 23 धावात 1 बळी घेतला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. डय़ू प्लेसिस, गो. जडेजा 60 (34 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), शिखर धवन झे. धोनी, गो. हॅझलवूड 7 (7 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर झे. गायकवाड, गो. हॅझलवूड 1 (8 चेंडू), अक्षर पटेल झे. बदली खेळाडू (सॅन्टनर), गो. अली 10 (11 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत नाबाद 51 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), शिमरॉन हेतमेयर झे. जडेजा, गो. ब्रेव्हो 37 (24 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), टॉम करण नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 5 बाद 172.
गडी बाद होण्याचा क्रम
1-36 (धवन, 3.2), 2-50 (श्रेयस, 5.3), 3-77 (अक्षर, 9.4), 4-80 (पृथ्वी शॉ, 10.2), 5-163 (हेतमेयर, 18.4).
गोलंदाजी
दीपक चहर 3-0-26-0, जोश हॅझलवूड 4-0-29-2, शार्दुल ठाकुर 3-0-36-0, रविंद्र जडेजा 3-0-23-1, मोईन अली 4-0-27-1, डेव्हॉन ब्रेव्हो 3-0-31-1.
चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. पटेल, गो. अवेश खान 70 (50 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस त्रि. गो. नोर्त्झे 1 (2 चेंडू), रॉबिन उत्थप्पा झे. अय्यर, गो. करण 63 (44 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), शार्दुल ठाकुर झे. अय्यर, गो. करण 0 (1 चेंडू), अम्बाती रायुडू धावचीत (अय्यर-रबाडा) 1 (3 चेंडू), मोईन अली झे. रबाडा, गो. करण 16 (12 चेंडूत 2 चौकार), धोनी नाबाद 18 (6 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 4. एकूण 19.4 षटकात 6 बाद 173.
गडी बाद होण्याचा क्रम
1-3 (प्लेसिस, 0.4), 2-113 (उत्थप्पा, 13.3), 3-117 (शार्दुल, 13.6), 4-119 (रायुडू, 14.4), 5-149 (ऋतुराज, 18.1), 6-160 (मोईन, 19.1).
गोलंदाजी
ऍनरिच नोर्त्झे 4-0-31-1, अवेश खान 4-0-47-1, रबाडा 3-0-23-0, अक्षर पटेल 3-0-23-0, टॉम करण 3.4-0-29-3, रविचंद्रन अश्विन 2-0-19-0.
पृथ्वी शॉचा एकच फॉर्म्युला….सी द बॉल, हिट द बॉल! तरीही…
पृथ्वी शॉने या हंगामातील सर्वोत्तम खेळी साकारत असताना हॅझलवूडला चौकार, षटकारासाठी फटकावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले होते आणि तोच धडाका त्याने पूर्ण डावात कायम राखला. दीपक चहरच्या डावातील दुसऱया षटकात तर पृथ्वी शॉने सलग 4 चौकार फटकावले. यातील पहिला चौकार इनसाईड एजचा तर पुढील दोन चौकार स्क्वेअर कटचे होते. चौथा चौकार त्याने फ्लिकवर वसूल केला. शॉचा सी-द-बॉल, हिट-द-बॉल फॉर्म्युला यावेळी दिल्लीचा चांगलाच फलद्रूप झाला. या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर त्याने 27 चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. अर्थात, शॉची ही खेळी संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही.
ऋतुराज-उत्थप्पाची फटकेबाजी, धोनीचे फिनिशिंग ठरले निर्णायक!
विजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना ऋतुराज गायकवाड व रॉबिन उत्थप्पा यांनी दुसऱया गडय़ासाठी 114 धावांची भरभक्कम शतकी भागीदारी साकारली आणि इथेच चेन्नईच्या विजयाची उत्तम पायाभरणी झाली. वास्तविक, उत्थप्पानंतर ऋतुराज देखील ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला होता. पण, धोनीने पुन्हा एकदा फिनिशरचे बिरुद सार्थ ठरवत केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली आणि चेन्नईने देदीप्यमान विजय संपादन केला.
शेवटच्या षटकात 13 धावांची गरज आणि धोनी बरसत राहिला!
टॉम करणच्या डावातील शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज असताना मोईन अली डीप स्क्वेअर लेगवरील रबाडाकरवी झेलबाद झाला आणि 5 चेंडूत 13, असे नवे समीकरण झाले. यानंतर धोनीने दुसऱया चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तर तिसऱया चेंडूवर इनसाईड एजवर आणखी एक चौकार वसूल केला. उर्वरित 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना टॉमने वाईड टाकला आणि विजयासाठी 4 धावांची गरज असताना धोनीने डीप स्क्वेअर लेगला आणखी एक चौकार फटकावत आपल्या फिनिशिंग टचची ताकद खऱया अर्थाने सिद्ध करुन दाखवली!