प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील महालक्ष्मी नगरामध्ये महिलेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी तिची मुलगी व दिराला पोलिसांनी अटक केली. त्यांना सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिची मुलगी अनिता महादेव जाधव व तिचा दीर शिवानंद भीमप्पा जाधव (दोघे रा. काखंडगी, कर्नाटक) या दोघांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीबाई हिचा रविवारी पहाटे गळा दाबून खून केल्याप्रकरणी कविता हणमंतू भोसले (वय 40, रा. गोसकीनगर, कुमठे) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती घेतली.
यावेळी पोलिसांच्या तपासामध्ये मुलगी अनिता हिचा पती महादेव भीमप्पा जाधव याचे सासू लक्ष्मीबाई हिच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे अनिता हिने दीर शिवानंद याच्याशी संबंध ठेवून लक्ष्मीबाई हिचा काटा काढण्याचे ठरवले. अनिता व शिवानंद हे दोघे घटनेदिवशी कर्नाटकातून दुचाकीवरून सोलापुरात आले. लक्ष्मीबाईचा आवाज येऊ नये म्हणून तोंडात टॉवेलचा बोळा कोंबला आणि गळा दाबून खून केला आणि दोघेही कर्नाटकात निघून गेले.
पोलिसांनी तेथून अनिता व शिवानंद या दोघांना अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ हे करीत आहेत