प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खा. रणजीतसिंह निंबाळकर आले असता कुठलाही ठोस आश्वासन किंवा मदत जाहीर न केल्यामुळे आले खासदार गेले खासदार अशीच भावना सर्वसामान्य करत आहेत.
आज करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर खा. रणजितसिंह निंबाळकर आपल्या खासदार फंडातून काही मदत निधी जाहीर करतील व ऑक्सिजन व रेमेडीसिवीर इंजेक्शन संदर्भात काही इंजेक्शन पुरवठा संदर्भात निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र केवळ तीस मिनिटांच्या दौऱ्यात त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा येथील सेंटरला भेट दिली आणि तात्काळ कुर्डूवाडीकडे रवाना झाले.
यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ज्या पद्धतीने नगरचे खासदार सुजय विखे यांनी स्वतः प्रयत्न करून दिल्लीवरून त्यांच्या मतदारसंघात इंजेक्शनचे वाटप केले त्या पद्धतीने आपले नियोजन काय आहे का यावर बोलताना ते म्हणाले की विखे यांचे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असून त्या माध्यमातून त्यांनी इंजेक्शन्स मागवले तरीसुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून जास्तीत जास्त ऑक्सिजन व इंजेक्शनचा पुरवठा करमाळा तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले.
शासनाकडून कोवीङ सेंटरला पुरवठा होत असलेले इंजेक्शन्स नेमकी कोणत्या रुग्णाला दिली जातात हे जाहीर होत नसल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. यावर बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की करमाळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा कार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे. खा. रंणजीतसिंह निंबाळकर यांनी आपल्या खासदार फंडातून आज करमाळा तालुक्यासाठी कोरोनाच्या लढाईसाठी रुग्णवाहिका ,ऑक्सीजन, सिलेंडर इंजेक्शन्स यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.