आदमापूर देवस्थान व आपला कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर भोसले याने केले स्पष्ट
प्रतिनिधी / करमाळा
आदमापूर जि. कोल्हापूर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामाचा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे. येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापूर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी स्पष्ट केले.
मनोहर मामा यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्यावर बारामती येथे फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश नानासाहेब आटोळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अंधश्रद्धेतून सात लाखाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. याचबरोबर आज दि.31 ऑगस्ट रोजी रविंद्र मोहिते यांनी करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली अशी कि माजी पत्नी सतत आजारी असल्याने मी तिला घेऊन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊन उपचार घेतला होता तरी तिला काही देखील फरक पडत नाही. त्यानंतर मी उंदरगाव येथील भोंदु बाळूमामा घेऊन उंदरगाव येथे घेऊन गेलो, त्या महाराजांनी रक्कम एक लाख रुपये मागितले व फरक जाणवेल असे सांगितले. त्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला परत जाणवेल असे सांगितले. त्यानंतर मी रक्कम रुपये एक लाख ही रोख स्वरूपात वरील भोंदुबाबा मनोहर भोसले यांचे शिष्य विशाल वाघमारे यास दिले. परंतु काही फरक पडला नाही. म्हणून मी या बाबा विषयी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये आज तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
आदमापूर ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील मनोहर मामा यांच्याबद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे. आपण बाळूमामाचे भक्त आहोत. बाळूमामाची उपासना करतो, पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही. तसेच श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही, असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे संत बाळूमामांचे मूळ स्थान आहे. येथील ग्रामपंचायतीने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे. यावर ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे.