प्रतिनिधी / सोलापूर
कर्तव्यावर असताना अज्ञात कारणावरून विष प्राशन करून महिला पोलिसाने बुधवारी आत्महत्या केली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद झाली आहे. याप्रकरणी दोन दिवसात गुन्हा दाखल होणार आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी पोलीस शिपाई अमृता रमेश पांगरे (वय ३८ रा. लक्ष्मी नगर बाळे सोलापूर) या काम पहात होते. बुधवारी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलुर येथील बस स्थानकाजवळ बेशुध् स्थितीत आढळून आल्या होत्या.
त्यांना सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत पोलीस शिपाई अमृता पांगरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस शिपाई अमृता पांगरे यांच्या आत्महत्येप्रकरणी नातेवाईक फिर्याद देतील. त्या प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल. नातेवाईक दोन दिवसानंतर फिर्याद देणार आहेत.