तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
संपूर्ण कुटूंब कोरोनाबाधित असल्यामुळे सर्वजण एका मंगल कार्यालयात संस्थात्मक विलगिकरणात उपचार घेत असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोख रकमेसह ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ६ ते दि. १५ या दरम्यान माढा रस्त्यालगत ब्लड बँकेजवळ घडली. याची फिर्याद संतोषकुमार मिठुलाल लुक्कड (वय ४५ रा.कुर्डुवाडी) यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
म्हणतात ना संकटे आली की चहू बाजूंनी येतात त्याचाच प्रत्यय फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला आला. फिर्यादी व त्याचा भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करुन संपूर्ण कुटुंबाचा गाडा हाकत होते. दरम्यान दि. ६ रोजी फिर्यादी व त्याचा भाऊ दोघेही कमावते कोरोनाबाधित झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांची तपासणी केली असता तेही कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये आई वडिल हे वयस्कर असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाने येथील मंगल कार्यालयात संस्थात्मक विलगीकरणात राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्या घराला बाहेरच्या बाजूने कुलुप होते. चोरट्यांनी नेमका याचाच फायदा घेऊन दाराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला. घरातील दिवान व दोन खोल्यांतील दोन्ही कपाटामधील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील रोख ८ हजार रुपये, सोन्याचे दागिने व दोन गॅस सिलेंडर असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी फिर्यादी संतोष याला फोन करुन घराला कुलूप नसल्याचे सांगितल्यानंतर ते कोविड केअर सेंटरमधून घरी आले. त्यावेळी त्यांना घरातील सर्व खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे दिसले.