वृत्तसंस्था/ हिसार
येथे सुरु असलेल्या सहाव्या इलाईट पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत हरियाणाचा गौरव सोळंकी तसेच सेनादलाचा हुसामुद्दीन आणि विश्वामित्र यांनी आपल्या वजन गटातून विजय नोंदविले.
60 किलो वजन गटातील झालेल्या लढतीत हरियाणाच्या गौरव सोळंकीने हिमाचल प्रदेशच्या नवराज चौहानचा 5-2 अशा गुणांनी पराभव केला. आता सोळंकीचा पुढील फेरीतील सामना मध्यप्रदेशच्या हरेंद्रसिंग बरोबर मंगळवारी होणार आहे. सोळंकीने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. पुरुषांच्या 57 किलो वजन गटात सेनादलाचा हुसामुद्दीनने आसामच्या बुलेन बुरागोहेनवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. 2022 च्या आशियाई स्पर्धेत हुसामुद्दीनने कांस्यपदक मिळविले होते. त्याचा पुढील फेरीतील सामना मिझोरामच्या लालवेमाशी होणार आहे. पुरुषांच्या 51 किलो वजन गटात विश्वामित्रने ओडिसाच्या एन. मधाभाचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. विश्वामित्रचा पुढील फेरीतील सामना आंध्रप्रदेशच्या प्रभूदास येडेलाशी होणार आहे. 60 किलो वजन गटात रेल्वेच्या वरिंदरसिंगने चंदिगडच्या राहूलचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 63 किलो गटात अंकित नरवालने पाँडेचेरीच्या अरुणकुमारवर मात केली. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे सुमारे 386 स्पर्धक सहभागी झाले असून विविध 13 वजन गटात लढती होत आहेत.