वाईचा उपकोषागार अधिकारी सापळय़ात अडकला
प्रतिनिधी/ सातारा
वाई येथील उपकोषागार अधिकारी सुधाकर शंकर कुमावत याला 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. कुमावत याने तीन महिन्याचा पगार आणि लाभाचा फरक मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून पैसे मागितले होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.
अशोक शिर्के म्हणाले, एका तक्रारदाराने आमच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण 2 लाख 77 हजार 685 रुपयांचे बिल कोषागार कार्यालयात गेल्या कित्येक दिवसापासून निघत नाही. अनेक हेलपाटे मारले तरी काहीच कार्यालयातुन प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, त्या कार्यालयातल्या उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत याने ही रक्कम मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती दोन हजारावर व्यवहार ठरला. त्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करताच लाचलुचपतचे सापळा पथक पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी वाई येथे दि. 20 रोजी सापळा लावून कुमावत याना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले यांनी केली आहे.