गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद : ईनलाईन स्केटवर स्पिनिंग हुला हुप्समध्ये 100 मीटर अंतर केवळ 23.45 सेकंदांमध्ये पूर्ण
जे. अब्बास मुल्ला / हुबळी
हुबळी येथील 10 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने ईनलाईन स्केटवर स्पिनिंग हुला हुप्सदरम्यान जलदगतीने 100 मीटर अंतर केवळ 23.45 सेकंदांमध्ये पूर्ण करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. परिवर्तन गुरुकुल शाळेतील स्तुती किशोर कुलकर्णी या विद्यार्थिनीने ऑस्ट्रेलियातील मारवा इब्राहिम यांचा विक्रम मोडीत काढला आहे. मारवा यांनी 27 सेकंदांमध्ये हे अंतर गाठले होते.
8 जानेवारी रोजी स्तुतीने ही विक्रमी कामगिरी केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱयांच्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करत स्केटिंगचे चित्रीकरण करत त्याची चित्रफीत पाठविण्यात आली होती. तांत्रिक प्रमाणीकरणानंतर चित्रफितीला विक्रमासाठी मान्यता मिळाल्याची माहिती स्तुतीच्या आई रश्मी कुलकर्णी यांनी दिली. विक्रमी कामगिरीसाठी पायाभूत सुविधा व सरावाचा अभाव होता. अशा स्थितीत टेंडरशूअर रोडचा वापर करत तसेच स्वतंत्र साक्षीदार पोलीस निरीक्षक जगदीश हंचिनाळ, सायकलपटू आणि आयर्न मॅन फिनिशर श्रीकांत देशपांडे, सनदी लेखापाल उदय शेट्टी यांच्या उपस्थितीत स्तुतीने ही विक्रमी कामगिरी केली आहे. वयाच्या 4 वर्षांपासून स्तुतीला हुला हुप्समध्ये कामगिरी करण्याची इच्छा होती. तिची रुची पाहता हुला हुप्स करत जलदगतीने ईनलाईन स्केट्सचे प्रशिक्षण दिल्याची माहिती स्केटिंग प्रशिक्षक अक्षय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
स्तुतीने यापूर्वीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. 2018-2020 या कालावधीत तिने या सर्वांसाठी कामगिरी केली आहे. त्यानंतर हुला हुप्सद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी तिने केल्याचे स्तुतीचे वडील किशोर कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनमध्ये सरावावर भर लॉकडाऊनच्या काळात शालेय अभ्यासाचा ताण नसल्याने स्तुतीने या कालावधीचा प्रभावी वापर केला आहे. तिने बहुतांश वेळ सराव करत क्षमतावृद्धी करण्यावर भर दिला होता. तसेच चित्रफितींचा अभ्यास करत तिने त्यातील बारकावे जाणून घेतले. प्रशिक्षकाने ऑनलाईन फिटनेस क्लास घेतल्याचे रश्मी कुलकर्णी यांनी म्हटले आहे.