वृत्तसंस्था/ लंडन
एफ-वन मोटार रेसिंग ग्रां प्रि क्षेत्रातील ब्रिटनचा अव्वल चालक 36 वर्षीय लेवीस हॅमिल्टनबरोबर मर्सिडीज संघाने एक वर्षांसाठी नवा करार केला आहे. मर्सिडीस संघाच्या अधिकाऱयाने ही घोषणा सोमवारी केली.
ब्रिटनच्या हॅमिल्टनने एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व राखताना आतापर्यंत सातवेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. पुढील महिन्यात बहरीन येथे एफ-वन मोटार रेसिंग 2021 च्या हंगामाला प्रारंभ होत आहे. मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये मर्सिडीज आणि लेवीस यांनी संयुक्तपणे गेल्या आठ हंगामात दर्जेदार कामगिरी करत नवा इतिहास घडविला आहे. हॅमिल्टनने जर्मनीच्या शुमाकरच्या विक्रमाशी 2020 साली बरोबरी केली होती. शुमाकरने आपल्या वैयक्तिक मोटार रेसिंग कारकीर्दीत सातवेळा विश्वविजेतेपद मिळविले होते. ब्रिटनच्या हॅमिल्टनने गेल्यावर्षी त्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.