विविध आकृत्यांची तब्बल 17 शिल्पे : असरोंडी विद्यालयाची शोधमोहीम
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
एकीकडे निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या सिंधुदुर्गात आता अतिप्राचिन असलेल्या कातळशिल्पांच्या खजिन्याची दिवसेंदिवस भर पडत आहे. रविवारी मालवण तालुक्यातील हेदुळ व ओवळिये गावांच्या सीमेदरम्यानच्या आपटय़ाचा काताळ व ओवळिये धनगरवाडी या परिसरात मिळून तब्बल 17 कातळशिल्पे आढळली. असरोंडी विद्यालयाचे इतिहास शिक्षक कमलेश गोसावी यांनी असरोंडी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या साथीने शोधमोहीम राबवत ही शिल्पे जिल्हावासीयांसमोर आणली आहेत.
यामध्ये आपटय़ाचा काताळ परिसरात 11 कातळशिल्पे आढळली असून यातील सहा शिल्पे सुस्थितीत दिसत आहेत. तर ओवळिये धनगरवाडीनजीक सहा कातळशिल्पे आढळली असून यातीलही काही सुस्थितीत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अश्मयुगीन मानवाच्या हत्यारांचे अवशेषही सापडले आहेत.
विविध आकृत्यांची शिल्पे
आपटय़ाचा काताळ येथे सापडलेल्या शिल्पांमध्ये माशांचे आकार, चंद्राकृती, मोठी अर्धवर्तुळाकार आकृती, लक्ष वेधून घेणारी सुबक व उठावदार मानवाकृती आदींचा समावेश आहे. आपटय़ाचा काताळ येथून जवळच असलेल्या ओवळिये – धनगरवाडीच्या शेजारी आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये मोठय़ा पानाच्या आकारातील नागमोडी रेषा असलेली एक आकृती, मोठा पक्षी तसेच एक अर्ध व एक पूर्ण मानवाकृती आहे. मात्र, काही कातळशिल्पांची मोठय़ा प्रमाणात झिज झाली असल्याने त्यांचा अर्थबोध होत नाही.
विद्यार्थ्यांद्वारे शोधमोहीम
असरोंडी विद्यालयाचे इतिहास शिक्षक कमलेश गोसावी म्हणाले, वर्गातील अध्ययनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट उपक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार, आम्ही परिसरातील कातळशिल्पांचा शोध सुरू केला. या शोधमोहिमा सुट्टीच्या दिवशी घेतल्या जातात. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही शोधमोहीम राबविली जाते. त्यानुसारच आम्ही हेदुळ व ओवळिये परिसर गाठला. तेथे साफसफाई केल्यानंतर ही कातळशिल्पे अतिप्राचिन असल्याचे समजून आल्याचे गोसावी म्हणाले. या शोधमोहिमेत ऋतुज गोसावी, असरोंडी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी देवू जंगले, अनिकेत गावडे, राकेश बाणे आदी सहभागी झाले होते.