आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे
कोल्हापूर / धीरज बरगे
माळरानाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानात झालेल्या शास्त्रीनगर मैदानाचे उद्घाटन हेलिकॉप्टर शॉटने होण्याची शक्यता आहे. मैदान साकारण्याचे गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले काम लवकरच पूर्ण होईल. मैदानासाठी विशेष परीश्रम घेतलेले क्रिकेटपटू काका पाटील यांच्याकडून मैदानाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडून पाठपुरावा सुरु असून पुढील काळात महेंदसिंग धोनी कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. आयुष्यभर ज्या मैदानावर प्रेम केलं ते मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवायचे असा निर्धार क्रिकेटपटू काका पाटील यांनी केला. सुरवातील त्यांच्या या स्वप्नाकडे बऱयाच जणांनी सत्यात न उतरणारे स्वप्न या दृष्टीनेच पाहिले. मात्र पाटील यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी राजकीय, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरु ठेवल्या. हळूहळू मदतीसाठी नागरिक पुढे येवू लागले. यामधून मैदान सकारण्यास सुरवात झाली. नंतर याकामाला केंद्र सरकारने 3 कोटी आणि महापालिकेने 80 कोटींचा निधी देवून गती दिली. मैदानाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच शंभर टक्के काम पूर्ण होईल.
25 हजार पेक्षक क्षमतेचे मैदान साधारणता 25 हजार प्रेक्षक क्षमतेचे हे मैदान आहे. सीमारेषेच्या बाहेरच्या बाजूस न्यूझीलंड मधील मैदानावरील लॉनच्या धर्तीवर प्रेक्षकांना लॉनवर बसून सामने पाहता येणार आहेत. पॅव्हेलीयन इमारतीमध्ये उत्तम दर्जाचा जलतरण तलावासह जिम असलेला सुसज्ज क्लब असणार आहे. मैदानात मुख्य सात खेळपट्टी मैदानात समाने खेळाल्या जाणाऱया एकूण सात मुख्य खेळपट्टी आहेत. यामध्ये ब्लॅक सॉईलच्या दोन आणि रेड सॉईलच्या पाच खेळपट्टी आहेत. तर सरावासाठी तीन सिमेंट आणि चार टर्फच्या खेळपट्टी बनवल्या आहेत.
अत्याधुनिक यंत्रणेने मैदान सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे हे मैदान असणार आहे. मैदानभर अंडरग्राऊंड ऑडिओ केबल सिस्टीम आणि कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सामने प्रकाशझोतात खेळण्यासाठी अद्ययावत यंत्रणा इथे वापरण्यात आली आहे. मैदानाच्या चार बाजूंना चार टॉवर उभे केले आहेत. सात खेळपट्टींवर प्रकाश टाकण्यासाठी एक हजार दोनशे लक्ष प्रकाश तीव्रतेचे तर आऊट फिल्डवर प्रकाश टाकण्यासाठी चारशे लक्ष प्रकाश तीव्रता क्षमता असलेले हे चार टॉवर आहेत. ऑस्ट्रेलियन, बंगाल सिलेक्शन लॉन मैदानावर ऑस्टेलियन आणि बंगाल सिलेक्शन लॉनचा वापर करण्यात आला आहे. लॉनची निगा राखण्यासाठी दररोज 80 हजार लिटर पाणी लागते. दर तीन दिवसांनी लॉन कटींग करावे लागते. पाणी जास्त झाल्यास किंवा पावसाळÎात जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तम दर्जाची ड्रेनेज सिस्टीम मैदानाच्या चारही बाजूने बसविण्यात आली आहे.