महिला आयोगाची CBSE ला नोटीस
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या इंग्रजी विषयातील प्रश्नपत्रिकेत महिलांन विषयी अवमानकारक उल्लेख केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. हा आक्षेपार्ह उतारा ११ डिसेंबर रोजी झालेल्या ‘सीबीएसई’च्या दहावीच्या इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत होता. यामुळे ‘सीबीएसई’ने तो आक्षेपार्ह उतारा मागे घेतल्याची आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचे पूर्ण गुण देण्याची घोषणा केली आहे.
अशातच दिल्ली महिला आयोगाने सोमवारी सीबीएसईला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये वादग्रस्त परिच्छेद निवडणाऱ्या जबाबदार व्यक्तीचे नाव, पद सांगण्याचे तसेच त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा करण्यात आली आहे.
लोकसभेत अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वादग्रस्त उताऱ्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, मुस्लीम लीग आदी विरोधी पक्षांनी निषेध नोंदवत सभात्याग केला होता. या संबधीत उतारा मागे घेतला जाणार असुन विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे पूर्ण गुण दिले जातील, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले. लोकसभेत या ‘प्रश्ना’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर ‘सीबीएसई’ने संबंधित प्रश्न आक्षेपार्ह ठरवला.