प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्याबरोबरच रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. स्मार्ट रोड निर्माण करण्याकरीता काँक्रिटीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात 70 कि. मी. चा रस्ता पेव्हर्स ब्लॉकचा करण्यात येणार असून, याकरिता 60 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शहर आणि उपनगरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या विकासासाठी अडिचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याच्या शेजारी गटारी बांधण्या ऐवजी पाईप घालण्यात येत आहेत. तसेच जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, मोबाईल केबल घालण्यासाठी रस्त्या शेजारी जागा सोडण्यात आली आहे. वाहने धावणाऱया रस्त्याचे काँक्रिटीकरण करून रस्त्या शेजारी शिल्लक राहिलेल्या जागेत पेव्हर्स घालण्यात येत आहेत. कोणत्याही वाहिन्या घालण्यासाठी काँक्रिटचे रस्ते फोडावे लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे रस्त्या शेजारी पेव्हर्स घालण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. स्मार्ट रोड करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी कंपनीने प्रयत्न चालविले आहेत. पण काही ठिकाणी रस्त्याचा दर्जा व्यवस्थित नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्याचा विकास करण्याची तरतूद योजनेमध्ये आहे. 70 कि. मी. चा रस्ता पेव्हर्स ब्लॉकचा करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता 60 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरात गॅस लाईन व 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या घालण्याचे काम शिल्लक आहे. त्यामुळे रस्ते खोदण्यात येणार आहेत. काँक्रिटीकरण करण्यात आलेले पुन्हा खोदावे लागणार असल्याने रस्त्याची दुरावस्था होण्याची शक्मयता आहे. ही बाब लक्षात घेऊन काही रस्ते पेव्हर्स ब्लॉक्सचे करण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने तयार केला आहे.
शहरात पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते करण्यासाठी पहिल्यांदाच 60 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण पेव्हर्सचे रस्ते शहरातील वाहनधारकांसाठी योग्य आहेत का याची चाचपणी करण्याची गरज आहे. यापूर्वी महापालिकेने विविध ठिकाणी पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते निर्माण केले आहेत. पण सदर रस्त्यावर दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ अपघात होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी घालण्यात आलेले पेव्हर्सचे रस्ते खराब झाले असुन, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यातील सुविधांचा विचार करून पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. पण हे रस्ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पेव्हर्सचे रस्ते करण्यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीने तांत्रिक चाचणी करावी, तसेच वाहनधारकांची मते जाणून घ्यावी अशी मागणी होत आहे. स्मार्ट रस्ते करण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण काही रस्त्यांचा विकास पेव्हर्स ब्लॉक घालुन करण्यात येत आहे. वारंवार रस्ते खोदण्यात येत असल्याने पेव्हर्स ब्लॉकचा रस्ता करण्याचा पर्यांय स्मार्ट सिटी कंपनीने निवडला असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर यांनी दिली. तर जर वाहनधारकांना पेव्हर्सचे रस्ते धोकादायक ठरत असल्यास यापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांची पाहणी करून नंतरच पेव्हर्सचे रस्ते करण्यात येईल अशी माहिती देखील कार्यकारी संचालक शशिधर कुरेर यांनी दिली.