अमेझॉनचा एक हिस्सा पेरू देशाला लागून आहे. या भागात एक नदी सातत्याने उकळत असून याला बॉयलिंग रिव्हर म्हटले जाते. याचे सरासरी तापमान 86 अंश सेल्सिअस राहते. वैज्ञानिक याला जगातील सर्वात मोठी थर्मल रिव्हर मानत आहेत. अखेर नदीच्या उकळण्यामागे कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नदीला मयानतुयाकू या नावानेही ओळखले जाते.
या नदीच्या शोधामागे भूवैज्ञानिक आंद्रे रुजो यांची मोठी भूमिका आहे. आंद्रे यांनी बालपणी स्वतःच्या आजोबांकडून उकळत्या पाण्याच्या नदीविषयी ऐकले होते. लोककथेत याचा उल्लेख असेल तर नदी अस्तित्वात असेल असा विश्वास आंद्रे यांना होता. आंद्रे यांनी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये अमेझॉनच्या पेरू येथील जंगलात त्यांना उकळणारी नदी सापडली. सुमारे 4 मैल अंतरापर्यंत फैलावलेल्या या नदीनजीक अशानिन्का या आदिवासी समुदायाची वस्ती आहे. हा समुदाय या नदीला पवित्र मानतो आणि याला स्थानिक भाषेत मयानतुयाकू संबोधितो.

नदीचे पाणी अत्यंत तत्पत आहे. नदीत अनेक प्राणी कोसळताना आणि त्यांचे शरीर नष्ट होताना पाहिल्याचे आंद्रे सांगतात. त्यांनी या नदीविषयी ‘द बॉयलिंग रिव्हर ः ऍडव्हेंचर अँड डिस्कव्हरी इन द अमेझॉन’ या नावाने एक पुस्तकही लिहिले आहे.
या नदीपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर ज्वालामुखी आहे. यामुळे नदीचे पाणी का उकळतेय याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पाणी उकळण्यामागे भूगर्भीय हालचाली कारणीभूत असल्याचे मानण्यात येत आहे.
या नदीचे रहस्य जाणून घेण्यासाठी एक प्रकल्पही चालविला जात आहे. या प्रकल्पात आदिवासी समुदायालाही सामील करून घेण्यात आले आहे. कुठल्याही स्थितीत नदीत कचरा न फेकण्याची सूचना पर्यटकांना करण्यात येते.