जेट सूट परिधान करताच लोक होतात ‘सुपरमॅन’
ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने एक असा फ्लाइंग जेट सूट तयार केला आहे, ज्याच्या मदतीने आकाशात उडून त्याने तीन विश्वविक्रम मोडीत काढले आहेत. रिचर्ड ब्राउनिंग नावाच्या या व्यक्तीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून ठेवण्यात आलेल्या स्पीड इव्हेंटमध्ये हे विक्रम मोडीत काढले आहेत.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पहिल्यांदाच अँक स्पीड चॅलेंज ठेवली आहे. या स्पीड इव्हेंटचे नाव जेट सूट ट्रायएथलॉन होते. स्वतःचे बॉडी कंट्रोल्ड जेट इंजिन पॉवर सूट परिधान करून 100 मीटर स्प्रिंट करण्याचे पहिले आव्हान रिचर्ड समोर होते. या आव्हानासाठी रिचर्डने स्वतःसाठी एक स्पेशल जेट सूट तयार केला.

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढण्याचा रिचर्डचा उद्देश होता. बोल्टने 100 मीटरची शर्यत 9.58 सेकंदांमध्ये पूर्ण केली होती आणि हा एक जागतिक विक्रम आहे. स्वतःचा जेट इंजिन पॉवर सूट परिधान करून उड्डाण केल्यावर हा विक्रम मोडीत काढण्यास रिचर्ड यशस्वी ठरला आहे.
रिचर्डने 100 मीटर अंतर स्वतःच्या जेट इंजिन पॉवर सूटसह केवळ 7.69 सेकंदांमध्ये पूर्ण करत बोल्टचा विश्वविक्रम एकप्रकारे मोडीत काढला आहे. रिचर्ड त्यानंतर 100 मीटर हर्डल शर्यतीसाठी तयार झाला. 100 मीटर शर्यतीप्रमाणे वेगाने आकाशात उडता येणार नसल्याचे निर्देश रिचर्डला देण्यात आले होते. हर्डल समोर आल्यावर वर आणि खाली व्हावे लागेल, ज्यात वेग अणि नियंत्रण या कॉम्बिनेशचा वापर होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
रिचर्डला या शर्यतीत साउथहॅम्पटनचा ऍथलीट केलम ग्रेगसनची साथ मिळाली. ग्रेगसन आणि रिचर्डची एकाच विक्रमावर नजर होती. 1992 मध्ये 400 मीटरच्या अडथळय़ांच्या शर्यतीत विक्रम प्रस्थापित झाला होता. ही शर्यत केवळ 46.87 सेकंदांमध्ये पूर्ण करण्यात आली होती.
रिचर्ड आणि ग्रेगसनने या शर्यतीची सुरुवात उत्तम केली होती. पण काही काळानंतर ग्रेगसन मागे पडत गेले आणि रिचर्डने चांगली कामगिरी करत 400 मीटर हर्डल शर्यतीतही विश्वविक्रम प्रस्थापित करण्यास यश मिळविले. रिचर्डने ही शर्यत 42.06 सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे.
1992 मध्ये केविन यंग यांनी स्पेन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत अडथळय़ांच्या शर्यतीत विश्वविक्रम केला होता. रिचर्डने याचबरोबर पोल वॉल्ट चॅलेंजमध्येही विश्वविक्रम केला आहे. रिचर्डने हे चॅलेंज केवळ 13.09 सेकंदांमध्ये पूर्ण केले आहे.