हळदोणे येथे भव्य सभा, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षानेही आता बेरोजारीच्या मुद्यावर आक्रमकपणे काम सुरू केले असून हळदोणा येथून रोजगार यात्रा सुरू केली. या यात्रेला शेकडो स्थानिकांनी उपस्थिती लावली. पक्षाने रोजगार हमी तळागाळापर्यत पोहचविण्यासाठी कंबर कसली आहे. या दरम्यान कोपरा बैठका आणि घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला जात आहे. तसेच केजरीवाल यांच्या रोजगार हमी योजनेची माहिती दिली जात आहे.
राज्यात प्रथमच एक राजकीय पक्ष बेरोजारीच्या मुद्यावर आक्रमकपणे काम करत असून त्याद्वारे प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. गेल्या महिन्यात अरविंद केजरीवाल यांनी गोवा भेटीत प्रत्येक तरुणास रोजगार देण्याची हमी दिली होती. त्याचबरोबर जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत संबंधित कुटुंबातील एका तरुणाला दरमहा 3,000 रुपये, पर्यटन आणि खाणकाम बंदीमुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील. तसेच खाजगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱया गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. गोव्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, यासारख्या घोषणा केल्या होत्या.
या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने पक्षाने पुढाकार घेतला आहे. गोव्यातील तरुण नोकऱयांच्या फसव्या आश्वासनामुळे कंटाळले आहेत या पार्श्वभूमीवर आम आदमी नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणेल याबद्दल उत्साहित आहे. सध्या आम आदमी पक्ष गोव्याच्या भविष्यासाठी एकमेव पर्याय म्हणून पाहिला जात आहे.
बैठकीस उपस्थित तरुणांनी कौशल्य विद्यापीठाबाबत प्रश्न विचारले. स्पर्धात्मक जगात अस्तित्वात असलेला अभ्यासक्रम कमी पडत असल्याने चिंता व्यक्त केली. सावंत सरकारच्या अभ्यासक्रमांनी रोजगारक्षम कौशल्याकडे दुर्लक्ष केले आहे. कालच युनेस्कोच्या एका अहवालात गोव्यातील बहुतेक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळाही नाहीत, याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सावंत सरकारबद्दल प्रचंड नाराजी
गोमंतकीय मोठय़ा संख्येने आमच्या सभांमध्ये सामील होत आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण नोकऱया गमावल्यामुळे किंवा युवकांसाठी नवीन रोजगार निर्माण न केल्याने सावंत सरकारवर नाराज आहेत, असे हळदोणे विधानसभा प्रभारी ब्रूनो फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.