ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारी तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचे सत्र कायम असून, आज पेट्रोलच्या दरात 32 ते 35 पैशांची वाढ झाली. तर डिझेल तर कालच्या इतकेच आहेत. आज दिल्लीत पेट्रोलदर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोल 105. 92 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 96.91 रुपयांवर गेले आहे.

तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल दरात 35 पैसे तर डिझेल दरात 18 पैशांनी वाढ केली. गेल्या दोन महिन्यांतील पेट्रोलच्या किमतीतील ही 34 वी, तर डिझेलच्या किमतीतील 33 वी वाढ ठरली. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी इंधनदरांनी शंभरी पार केली आहे.
मध्य प्रदेशातील काही भागांत रविवारी डिझेलने शंभरचा टप्पा ओलांडला, तर पेट्रोलदराने शंभरी गाठणारे सिक्कीम हे नवे राज्य ठरले. दिल्लीत पेट्रोल 99.86 रुपये, तर डिझेल 89.36 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 100.75 रुपये तर डिझेल 93.91 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 99.84 रुपये तर डिझेल 92.27 रुपये इतके वाढले आहे.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 4 मेपासून पुन्हा इंधनदरवाढ सुरू करण्यात आली. दोन महिन्यांत पेट्रोलदरात 9.11 रुपये, तर डिझेलदरात 8.63 रुपयांनी वाढ करण्यात आली.
- पेट्रोलची शंभरी कुठे?
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब आदी ठिकाणी पेट्रोलने आधीच शंभरी गाठली होती. या यादीत आता सिक्कीमची भर पडली आहे.