गावात शंभरी ओलांडलेल्या लोकांची संख्या अधिक, गप्पागोष्टी करा, पुस्तके वाचा, मोकळय़ा हवेत हिंडा
इटलीच्या सार्दिनिया प्रांतात पेरडॅसडेफोगु नावाचे पर्वतीय क्षेत्रातील गाव आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 1,740 इतकी आहे. विशेष म्हणजे यातील 8 लोकांचे वय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. येथील बहुतांश परिवारांमधील 4-5 लोकांचे निधन शंभरी गाठल्यावरच झाले आहे. यंदा 5 जणांनी शंभरी ओलांडली आहे. पुढील 2 वर्षांमध्ये आणखीन 10 जण शतायू होणार आहेत. याच कारणामुळे सार्दिनियात वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱया मेणबत्त्यांचा पुरवठा सातत्याने कायम ठेवावा लागतो.

यंदा 5 वाढदिवसांमध्ये 500 कँडल्सचा वापर झाला आहे. सार्दिया प्रांत जगातील अशा 5 क्षेत्रांमध्ये सामील आहे, जेथे 100 हून अधिक वयाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या प्रांतात सध्या 534 लोकांचे वय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. इटलीत वयाची शंभरी गाठणाऱया लोकांची संख्या वेगाने वाढली आहे. 2009 मध्ये देशात अशा लोकांची संख्या 11 हजार होती. तर 2019 मध्ये हा आकडा वाढून 14,456 झाला. 2021 मध्ये हे प्रमाण 17,935 वर पोहोचले आहे.
अधिक आयुर्मानामागे निश्चितच उत्तम हवामान आणि चांगला आहार हे कारण आहे. याचबरोबर तणावाबद्दलचा लोकांचा दृष्टीकोनही कारणीभूत आहे. हे लोक 100 वर्षांपूर्वी जन्माला आले होते. त्यांनी भूकेचे संकट आणि महायुद्धांचा अनुभव घेतला आहे. जर कुठली समस्या उद्भवली तर ते त्यावर त्वरित तोडगा काढतात. या प्रांतात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
वाचन तुम्हाल जिवंत ठेवते असे उद्गार 100 वर्षीय ग्रॅब्रियल गार्सिया यांनी काढले आहेत. स्वच्छ हवा असलेल्या ठिकाणी आम्ही राहतो. येथील लोकांच्या दीर्घ आयुष्याचे आणखी एक रहस्य म्हणजे येथे सामुदायिकतेची भावना आहे. येथील वृद्ध घरी राहतात, वृद्धाश्रमाची कल्पना येथे अस्तित्वात नसल्याचे 105 वर्षीय मेलिस यांनी सांगितले आहे.