काही विद्यार्थ्यांमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे
प्रतिनिधी /बेळगाव
उचगाव येथील एका माध्यमिक शाळेमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव झाल्याने पाच दिवसांसाठी सदर शाळा सार्वजनिक शिक्षण खाते तालुका रेंज बेळगाव याच्या सूचनेनुसार बंद ठेवण्याचे आदेश शाळा प्रमुखांना देण्यात आले आहे.
सध्या सर्वच शाळांमधून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. सदर विद्यार्थी खासगी रुग्णालयातून उपचारही करून घेत असतानाचे चित्र दिसून येत आहे. उचगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद असल्याने सदर केंद्रामध्ये उपचारासाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चाचणीमध्ये कोरोना संसर्ग आढळल्याने विद्यार्थ्यांवरील पुढील धोका टाळण्यासाठी म्हणून शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. सदर शाळाप्रमुखांनी शाळेतील आजारी असलेल्या व अशी लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करून घेतली आणि त्यांचे रिपोर्ट तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. यासाठी तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थी, शिक्षकांनासुद्धा सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याचे दिसून येत आहे. यावर आरोग्य खाते, शिक्षण खाते यांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.