डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंड काँग्रेसमधील हरिश रावत यांच्या समर्थकांचा पक्षातील अन्य नेत्यांशी वाद वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी डेहराडून येथील पक्षाच्या मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शहा यांना मारहाण झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. हरिश रावत यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करत राजेंद्र शहा यांनी प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव यांच्याकडे तक्रार केली आहे. या गोंधळातच रावत यांनी तातडीने दिल्ली गाठत पक्षाच्या उच्चायुक्तांची भेट घेत आपली कैफियत मांडली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर काँग्रेस हायकमांडने विधिमंडळ पक्षनेते प्रितम सिंह, प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांच्यासह राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत पाचारण केले होते.