प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेने कर वसुलीसाठी घरोघरी जाऊन ऑनलाईन वसुली करण्यासाठी प्रयत्न चालविले असून त्याअनुषंगाने नगराध्यक्षांच्या कक्षात बँक अधिकाऱयांनी पालिकेच्या कर व वसुली विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱयांना प्रात्यक्षिके दाखविली.
पालिका संचालक कार्यालयातून चालीस लावण्यात आलेली कर वसुलीसाठीची ही पद्धत विविध पालिकांमध्ये अंमलात आणली गेली असल्याची माहिती मडगाव पालिकेचे कर व लेखा अधिकारी अभय राणे यांनी दिली. ऍक्सिस बँकेच्या अधिकाऱयांनी सदर वसुलीसाठीचे यंत्र कसे वापरायचे यासंदर्भात पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा पूजा नाईक उपस्थित होत्या.
पालिकेला कर्मचाऱयांना आता घरोघरी पाठवून घरपट्टी तसेच अन्य व्यापार करांचा तत्काळ भरणा करून घेणे शक्मय होणार आहे. रोख स्वरूपात तसेच अन्य ऑनलाईन माध्यमांचा वापर करून वसुली करणे शक्मय होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मडगाव पालिकेची मोठय़ा प्रमाणात कर थकबाकी पडून आहे. या थकबाकीचा आकडा 10 कोटींहून जास्त असून ही घरोघरी जाऊन कर वसुली करण्याची पद्धत चांगल्या प्रकारे राबविली गेली, तर थकबाकी वसुलीच्या बाबतीत पालिकेला मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा नाईक यांनी व्यक्त केली.
या नवीन ई-पद्धतीत कराचा भरणा केल्यानंतर ग्राहकाला तिथल्या तिथे पावती देणे शक्मय होणार आहे. यासंदर्भातील प्रात्यक्षिक यावेळी नगराध्यक्षा नाईक, नगरसेविका डॉरीस टेक्सेरा आणि कर व लेखा अधिकारी राणे यांना बँकेच्या अधिकाऱयांनी दाखविले.