वार्ताहर/ कणगले
येथील कणगले-कोणकेरी रस्त्यानजीक इण्डेन प्लँटकडून शेतवाडीकडे जाणाऱया महिलेच्या गळय़ातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी हिसडा मारुन लांबविल्याची घटना भरदिवसा घडली. महादेवी गुळगुळे असे सदर महिलेचे नाव आहे. महादेवी या दुपारी 2.30 च्या सुमारास शेतवाडीकडे जनावरांना चारा आणण्यासाठी जात होत्या. इण्डेन प्लँटनजीक दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी महादेवी यांच्या गळय़ातील मंगळसुत्र हिसडा मारून लांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महादेवी यांनी चोरटय़ाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यात मंगळसुत्राचा काही भाग महादेवी यांच्या हाती आला. तर उर्वरित भाग चोरटय़ांनी लांबविताना घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेमुळे कणगले परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.