वृक्षारोपणासाठी मोठी स्पर्धा, पक्षीय राजकारण सुरु झाल्याचे चित्र
प्रतिनिधी /पणजी
करंजाळेत एका हॉटेलसाठी रस्ता करण्याकरीता सुरूची झाडे कापण्यात आल्यानंतर त्याच जागी वृक्षारोपण करण्यासाठी आता मोठी स्पर्धा लागली आहे. पणजी मनपासह भाजप मंत्री जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, आप व काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी तेथे जाऊन विविध प्रकारची झाडे लावून झाडांच्या कत्तलीचा निषेध नोंदविला. झाडे कापणारे कोण हे अजून अधिकृतपणे उघड झालेले नसताना झाडे कापण्यासाठी आता पक्षीय राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
झाडे कापण्याचा प्रकार माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत काहीजणांनी तेथे जाऊन वृक्षारोपण केले. आप व काँग्रेस तसेच भाजप या तिन्ही पक्षांनी या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू केला असून खटाटोप चालवला आहे.
जेनिफर मोन्सेरात, रोहित मोन्सेरात यांच्यासमवेत भाजपचे काही नगरसेवक त्या जागेवर गेले आणि तेथे झाडे लावली. काँग्रेसतर्फे माजी महापौर उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो, टोनी फर्नांडिस, जनार्दन भंडारी व काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याच जागी झाडे लावण्याचा कार्यक्रम केला.
तक्रारीची दखल न घेतल्याबाबत आश्चर्य
‘आप’ या पक्षातर्फे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तेथे जाऊन झाडे लावली आणि झाडे कापण्याचा निषेध नोंदविला. दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी झाडे नेमकी कोणी कापली आणि त्यामागील सूत्रधार कोण ? याचा पर्दाफाश अद्यापही अधिकृतपणे झालेला नाही. झाडे कापली म्हणून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे, त्याचीही दखल कोणी घेतलेली नाही, आणि त्याबाबत कोणतीच कारवाई झालेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.