बेकायदेशीर बार चालवल्याच्या आरोपावरून स्मृती इराणी संतप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपल्या मुलीवर बेकायदेशीर बार चालवल्याच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड शब्दात स्पष्टीकरण दिले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मुलीवरील आरोप खोडून काढले. मुलीवर झालेले आरोप खोटे असून त्यासाठी काँग्रेसला न्यायालयात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझी मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे, ती कोणताही बार चालवत नाही. काँग्रेस माझी आणि माझ्या मुलीची बदनामी करत आहे’, असे स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रवक्त्यांनी माझ्या मुलीचा अपमान केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी कागद दाखवून माझी मुलगी बार चालवते, असे सांगितले. हे सर्व काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशानुसार होत आहे, असे अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी यांची मुलगी जोइश इराणी गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावाचे रेस्टॉरंट चालवत असून त्याचा परवाना बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ज्यांच्या नावाने दारू परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले होते, त्यांचे मालक 13 महिन्यांपूर्वी मरण पावले. यासंदर्भात वकील एरेज रॉड्रिग्ज यांनी तक्रार केली होती.
इराणींच्या प्रश्नावलीने आरोपकर्त्यांची कोंडी माझ्या मुलीला कारणे दाखवा नोटीस पाठवा, असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे. पण ते दाखवत असलेल्या पेपरमध्ये माझ्या मुलीचे नाव आहे का? काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरटीआयच्या आधारे माझ्या मुलीवर आरोप करत असल्याचे म्हटले आहे. त्या आरटीआय अर्जात माझ्या मुलीचे नाव आहे का? तसेच त्याच्या प्रत्युत्तरात तरी माझ्या मुलीचे नाव आहे का? असे विविध प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित करत आरोप करणाऱयांची कोंडी केली आहे