टोमॅटो 10 रु. किलो, भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्यांचे वाढलेले दर कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सोयीस्कर झाले आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दरदेखील कमी झाले आहेत. विशेषत: टोमॅटोचा दर गडगडला आहे. 10 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाली.
शनिवारच्या आठवडी बाजारात टोमॅटो 10 रु. किलो, ढबू 50 रु. किलो, गाजर 50 रु. किलो, बिन्स 50 रु. किलो, ओली मिरची 50 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, कोबी 10 रुपयाला एक, कारली 40 रु. किलो, हिरवा वाटाणा 50 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, भेंडी 50 रु. किलो, मेथी 10 रुपयाला दोन ते तीन पेंड्या, लालभाजी 10 रुपयाला दोन ते तीन पेंड्या, नवलकोल 10 रुपयाला पाच, कांदापात 20 रुपयाला पाच, शेपू 10 रुपयाला दोन, पालक 10 रुपयाला तीन पेंड्या, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी असा भाजीपाल्यांचा दर आहे.
मागील वर्षभरात भाजीपाल्यांचे दर भरमसाठ वाढले होते. मात्र आता स्थानिक भाजीपाला बाजारात दाखल होवू लागला आहे. त्यामुळे आवक वाढत आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सर्व भाजीपाला खरेदी करणे सोयीस्कर झाले आहे. पावसाळ्यात भाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले होते. मात्र आता भाजीपाला आवाक्यात आला आहे. विशेषत: फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. त्याबरोबर मागील आठवड्यात 15 ते 20 रु. किलो दराने विकला जाणारा टोमॅटो 10 रु. किलो झाला आहे.