प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना रक्ताची मागणी वाढत आहे. पण अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात सफ्ताहभर पुरेल इतका रक्तसाठा आहे. प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दीड महिना रक्तदान करता येत नाही, त्यामुळे लस घेण्यापुर्वीच रक्तदान करा, असे आवाहन आरोग्य विभागाने रक्तदात्यांना केले आहे. जिल्हय़ात 10 दिवस पुरेल, इतका रक्तसाठा असला तरी रक्तदान शिबिरे थांबल्याने जिल्हय़ातही सफ्ताहभरात अशाच स्थितीचा धोका आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच रक्तसंकट ओढवले आहे. राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री राजेश शिंगणे यांनी राज्यात सफ्ताहभर पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था रक्तपेढय़ांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसाठा वाढवावा, रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून रक्तदान करा, असे आवाहन केले आहे. राज्यात येत्या काही दिवसांत रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापुर्वी रक्तदान करा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर 28 ते 45 दिवस रक्तदान करता येणार नाही, त्यामुळे रक्तदान करणाऱयांची संख्या घटली आहे. हॉस्पिटल्समधून रक्ताची मागणी वाढली आहे. गुरूवारपासून 45 वर्षावरील सर्वच व्यक्तीना कोरोना लस दिली जात आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर 28 दिवस लाभार्थ्यांना रक्तदान करता येणार नाही, त्यामुळे लस घेण्यापुर्वीच रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. राज्यात एप्रिल ते जूनपर्यत रक्ताचा तुटवडा भासतो, आता तर कोरोनामुळे रक्तदान शिबिरांवर मर्यादा आल्या आहेत. जिल्हय़ात सद्यस्थितीत 10 दिवस पुरेल, इतका रक्तसाठा आहे.
कोल्हापुरात सीपीआरसह 12 रक्तपेढय़ा आहेत. यामध्ये महापालिकेची 1 आणि अन्य 10 खासगी रक्तपेढया आहेत. प्रतिदिन सरासरी 45 ते 50 पिशव्या रक्तदान होते. सध्या हे प्रमाण 25 ते 30 पिशव्यांइतके आहे. जिल्हय़ात आणखी दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. कोरोनामुळे रक्तदान शिबिरे रद्द होण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या तरी पुरेसे रक्त उपलब्ध असले तरी 10 दिवसानंतर जिल्हय़ातही रक्ताचा तुटवडा जाणवण्याचा धोका वाढला आहे, अशी माहिती रक्त संक्रमण अधिकारी दीपा शिपुरकर यांनी दिली.
Previous Articleराज्यात सध्या लॉकडाउन नाही : मुख्यमंत्री
Next Article विद्यागमसह नववीपर्यंतचे वर्ग बंद
Related Posts
Add A Comment