लसीकरण केंद्रांच्या निर्मितीस प्रारंभ : केंद्रासह राज्य सरकारकडून जोरदार तयारी : काही दिवसात लसीकरणाला प्रारंभ
देशाच्या राजधानीत पहिले लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार दक्षिण दिल्ली महापालिकेच्या मॅटर्निटी होममध्ये लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. दिल्लीत 1000 हून अधिक लसीकरण केंद्रे तयार करण्यात येत आहेत. या केंद्रांवर लसीकरणाचे कार्य सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. लसीकरणाचे लाभार्थी किंवा सरकारच्या यादीत नाव असलेल्या लोकांना विविध वेळेवर केंद्रांमध्ये बोलाविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी स्वतःचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
लस घेणाऱयांना नोंदणीपूर्व आणि नोंदणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. लसीकरण केंद्रांवर नोंदणी आणि ओळखपत्राची पडताळणीसाठी विविध डेस्कसोबत अधिकारी तैनात असतील. लसीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी लस टोचणार आहे. लसींच्या साठवणुकीसाठी डीप फ्रीजरची व्यवस्था असेल.

लस टोचून घेतल्यावर केंद्रात असलेल्या निरीक्षण कक्षात जावे लागणार आहे. तेथे लाभार्थ्याला 30 मिनिटांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कक्षात पेयजल आणि स्वच्छतागृहाची सुविधा ठेवण्याचे निर्देश आहेत. एखाद्याला समस्या उद्भवल्यास त्याच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाइन कर्मचाऱयांसह पहिल्या टप्प्यात लस मिळविणाऱया ज्येष्ठ नागरिकांना मतदारयादीच्या आधारावर निवडण्यात येणार आहे. को-विन या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लाभार्थ्यांना ट्रक करण्यात येणार आहे. लस घेण्यापूर्वी या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदणीची पुष्टी करण्यात येणार आहे.

प्राथमिकतेच्या आधारावर पूर्वीच नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांनाच केंद्रात लस देण्यात येईल. एका केंद्रात दिवसभरात कमाल 100 लाभार्थ्यांनाच लस दिल जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत तीन श्रेणींना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे. यात 3 लाख आरोग्यकर्मचारी, 6 लाख प्रंटलाइन कर्मचारी म्हणजेच पोलीस, नागरी सुरक्षा तसेच 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचा समावेश असेल. दिल्लीत एकूण 51 लाख लोकांना पहिल्या टप्यात लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याकरता 1 कोटी 2 लाख डोसची गरज भासणार आहे. तसेच दिल्लीत सुमारे 609 कोल्डचेन पॉइंट्सची ओळख पटविण्यात आली आहे.
मुस्लीमबहुल भागात आव्हान

गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अहमदाबादचा अल्पसंख्याकबहुल भाग महापालिकेसाठी चिंतेचे विषय ठरले आहेत. या भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. अहमदाबाद महापालिकेने आतापर्यंत 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 6 लाख 55 हजार जणांची आतापर्यंत नोंदणी केली आहे. याचबरोबर कमी वय असलेले परंतु अन्य आजाराने त्रसत असलेल्या 24 हजार 800 जणांचीही नोंदणी झाली आहे. मुस्लीमबहुल भागांमध्ये नोंदणी अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. मध्य, दक्षिण आणि दक्षिणपूर्व भागात हे प्रमाण कमी राहिले आहे. सरकारी यंत्रणेवरील विश्वासाच्या अभावी लोक मोहिमेत सहभागी होऊन माहिती देणे टाळत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. महापालिकेने 40 हजार सरकारी आरोग्य कर्मचारी तर 15 हजार खासगी रुग्णालयांच्या कर्मचाऱयांना लसीकरणासाठी निवडले आहे. याचबरोबर लसीकरणासाठी 50 हजार अतिरिक्त प्रंटलाईन कर्मचाऱयांची ओळख पटविण्यात आली आहे.