घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यात गणेशाचे पारंपारिक पद्धतीने आगमन झाले. तालुक्यातील अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने मोजक्याच मंडळांच्या गणेशमूर्ती साध्या पद्धतीने प्रतिष्ठापीत करण्यात आल्या. घरोघरी मात्र भक्तीमय वातावरणात पारंपारिक पद्धतीने गणेशोत्वाचा प्रारंभ झाला. कोरोनामुळे गणेश आगमनाचा दरवर्षी सारखा जल्लोष व उत्साह दिसून आला नाही.
तालुक्यातील गणेशभक्त सकाळपासून गावोगावच्या कुंभारवाड्यात दाखल होत होते. कधी पावसाच्या सरी तर कधी उघडीप अशा वातावरणात लोक मुर्ती घेऊन जात होते. ज्या गावात कुंभार नाहीत अशा गावात कुंभारांनी कालच मूर्ती पोहच केल्या होत्या. काही ठिकाणी कुंभार मूर्ती घरपोच देत होते. घरातील मुर्तीची ११ वाजेपर्यंत प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांवर अनेक निर्बंध घातले असल्याने अनेक मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. मात्र काही मंडळांनी नियमावली पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. दरवर्षी विविध वाद्यांचे गजर मिरवणूका, फटाक्यांची आतषबाजी जोरदार असायची यावर्षी मात्र भक्ती तीच आहे मात्र बाप्पाचे आगमन शांततेत झाले आहे. सर्व भक्त कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना बाप्पा समोर करीत आहेत.