शनिवारी एकही रुग्ण नाही 28 बाधितांवर उपचार सुरू
प्रतिनिधी / मडगाव
कोविड हॉस्पिटलातून शनिवारी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला. अन्य दोघांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून ते निगेटिव्ह आल्यास त्यांना उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. दरम्यान, काल शनिवारी दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.
सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये 28 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत व त्यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गोव्यात आतापर्यंत 69 रुग्ण आढळले होते. त्यातील 41 जण बरे होऊन घरी गेले आहेत. उद्या आणखीन दोघांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
पावसाळय़ात खबरदारी घ्या
सध्या जेवढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ते सर्व इतर राज्यातून गोव्यात आले होते. स्थानिक गोवेकरांना अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही. पण आता पावसाळय़ात अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. जर पावसाळय़ात सर्दी-ताप येत असले तर त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टराला भेटावे. जर फॅमिली डॉक्टर उपचार करत नसेल तर सरकारी इस्पितळाला भेट द्यावी व डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
सरकारी इस्पितळात डॉक्टर थुंकीचे नमुने घेतील व ते चाचणीसाठी पाठवतील. एखादी चाचणी पॉझिटिव्ह निघाली तरी घाबरण्याचे कारण नाही. सरळ कोविड इस्पितळात भरती व्हावे, त्यानंतर आम्ही योग्य ते उपचार करण्यास समर्थ असल्याचे कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एडविन गोम्स यांनी सांगितले आहे. पावसाळय़ात जास्त करून वयस्क लोकांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सामाजिक अंतर व मास्क वापरण्याची सवय आता प्रत्येकाने केली पाहिजे. घरातून बाहेर पडताना व घरात येताना सेनिटायझरचा वापर करावा तसेच हात स्वच्छ धुतले पाहिजे. या गोष्टी केल्यास कोरोनापासून आपण सहजरित्या बचाव करू शकतो यावर त्यांनी पुन्हा एकदा भर दिलेला आहे.