लेकप्रतिनिधी व संघटनांचे जोरदार प्रयत्न, मुख्यालयात कामाची मिळाली संधी
प्रतिनिधी/ खेड
अलसुरे येथील 50 वर्षीय व्यक्तीच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधी व मॅग्मो संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही कारवाई मागे घेण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला असून तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांनी मंगळवारी पारीत केले.
दुबईतून परतलेल्या अलसुरे येथील व्यक्ती होम क्वारंटाईन असताना विशेष लक्ष ठेवण्याच्या करण्यात आलेल्या सूचनांचे योग्यरितीने पालन झाले नाही. या व्यक्तीचा कोरानामुळे मृत्यू झाल्याने कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर डॉ. ए. ए. मारकड यांच्याकडे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
या निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. शेळके यांनी 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱयांकडे विनंती अर्ज दाखल केला होता. सद्यस्थितीत वैद्यकीय अधिकाऱयांची कमतरता असल्याने डॉ. शेळके यांची विनंती मान्य करत निलंबनाचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. शेळके यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. या पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी मुख्यालयात त्वरित हजर राहण्याच्या सूचनाही आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आरोग्य समिती सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, खेडचे माजी आमदार संजयराव कदम, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी आरोग्य अधिकारी निलंबनाला तीव्र विरोध करून आदेश मागे घ्यावेत असा जोरदार आग्रह धरला होता. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठेचा केला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे सातत्याने हा आग्रह सुरु होता.
मॅग्मो या सरकारी वैद्यकीय अधिकाऱयांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांच्या नेतृत्वाखाली विविध अधिकारी निलंबनाच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन उभे राहिले होते. डॉ. राजेंद्र पवार, डॉ. कांचन रेडीयार, डॉ. ढगे, डॉ. गुंजोटे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकाऱयांनी आपल्या तीव्र भावना जिल्हा परिषद प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हा विषय लावून धरण्यात आला होता. अखेरीस बगाटे यांनी निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे.
संघटीत प्रयत्नांचे यश : डॉ. पितळे
संघटनेची एकजूट आणि अनेक लोकप्रतिनिधींचे सहकार्य यामुळे अन्यायकारक निलंबन मागे घ्यायला लावण्यात यश आले. आम्ही यापुढेही चुकीच्या गोष्टीविरोधात उभे राहू अशी प्रतिक्रिया मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांनी दिली.