प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील गोवळकोट येथे श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात नुकताच पाडवा लोटांगण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्त गेली अनेक वर्षे होणारा गळ टोचणीचा कार्यक्रम अंगावर शहारे आणणारा ठरला, तर महिलांनी हातात कडे घालून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या.
श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी हे प्रख्यात देवस्थान आहे. या देवस्थानचा संपूर्ण कोकणसह मुंबई, पुणेसह अन्यठिकाणी मोठा भक्तगण आहे. देवीचा शिमगोत्सव प्रसिध्द असून शेरणे काढणे कार्यक्रमाला मोठी पसंती मिळते. या देवस्थानच्या विविध कार्यक्रमांना शंभर वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे असे भाविक सांगतात. देवी करंजेश्वरी ही भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती महाराष्ट्रभर आहे.
येथे नुकताच पाडवा सण मोठय़ा उत्साहात साजरा झाला. यावेळी नवस करणाऱया भाविकांनी लोटांगण घालण्याची परंपरा आहे. त्यानुसार हा लक्षवेधी कार्यक्रम संपन्न झाला, तर महिलांनी हातामध्ये कडे घालून देवीची उपासना करत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. जितका नवस कडक तितके लवकर कडे सुटतात अशी भाविकांची धारणा आहे. असे केल्याने आपले मनोरथ पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी गळ टोचणी हा कार्यक्रमही पार पडला. मात्र तो पाहताना अंगावर शहारे आले. तरीही तो तितक्याच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त करंजेश्वरी मंदिर परिसरामध्ये छोटय़ा स्वरूपात यात्रा भरली होती. त्यात चिपळूण आणि परिसरातील भाविक सहभागी झाले होते.