प्रतिनिधी / सातारा :
चुतर्थ वार्षिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी वसुली विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी या कामांसाठी 30 पथकांची नियुक्ती केली आहे. नव्याने शहरात आलेल्या 30 हजार मिळकतींचीही पाहणी करण्यात येणार आहे. शहरातील पूर्वीच्या 33 हजार 500 मिळकतींची पाहणी करुन नोंद केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली.
शहराचे चतुर्थ वार्षिक पाहणीचे काम सुरु आहे. हे काम चांगल्या पद्धतीने व्हावे याकरता अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी वसुली विभागचे प्रमुख प्रकाश खटावकर यांच्यासमवेत सगळय़ा कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील मूळ भाग आणि नव्याने शहरात आलेला भाग यांचा सर्व्हे करताना तो कसा करावा याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे मूळच्या शहरातील 33 हजार 500 मिळकतींचे सर्व्हे होणार आहे. तर हद्दवाढ झालेल्या शाहुपूरी, शाहुनगर, खेड, पिरवाडी या भागातील सुमारे 30 हजार मिळकतींचा सर्व्हे होणार आहे. त्याकरता एकूण 30 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक टीममध्ये 1 लिपीक व एक शिपायी यांचा समावेश आहे. नव्याने हद्दीत आलेल्यांना पहिले पाच वर्ष करात सवलत असणार आहे. त्यांना 1 एप्रिल 2022 टप्प्याटप्याने कर लागू होणार आहे. 2027 पर्यंत हा कर टप्प्याटप्याने पालिकेइतकाच होणार आहे, असे पराग कोडगुले यांनी सांगितले.