यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंवर ‘मेक इन इंडिया’ भारी पडणार असे चिन्ह दिसत आहे. गेली अनेक वर्षे दिवाळीची आरास, पणत्या, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रिकच्या माळा इत्यादी चिनी बनावटीच्या वस्तूंनी भारताची बाजारपेठ भरलेली असे. या वस्तू स्वस्त असल्याने बरेचसे भारतीय ग्राहक त्यांच्या मोहात पडत असत. तथापि, यंदा चित्र वेगळेच दिसत आहे. चिनी वस्तूंऐवजी भारतीय बनावटीच्या त्याच वस्तू घेण्याकडे लोकांचा कल बराच वाढलेला आहे. बाजाराचे सर्वेक्षण करणाऱया काही संस्थांनी ही माहिती दिली आहे.

चीनकडून जगात पसरविण्यात आलेल्या कोरोनामुळे असे घडले आहे असे मानले जाते. शिवाय चिनी वस्तू स्वस्त असल्या तरी त्यांची गुणवत्ता अत्यंत हलकी असते. त्यामुळे त्या टिकत नाहीत, असा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे थोडय़ा महाग पडल्या तरी टिकाऊ भारतीय वस्तू घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः दिल्ली, मुंबई आणि कोलकाता इत्यादी महानगरांमध्ये ‘मेक इन इंडिया’ने चिनी मालाला चांगलेच मागे टाकल्याचे दिसून येत आहे. हीच स्थिती छोटय़ा शहरांमध्येही आहे. दिवाळीच्या बाजारात सध्या 70 टक्के भारतीय वस्तू असून केवळ 30 टक्के चिनी आहेत, असे अनेक व्यापाऱयांनी म्हटले आहे.
भारतीय वस्तूंची गुणवत्ता तर चांगली आहेच याशिवाय त्या दुरुस्तही होऊ शकतात. त्यामुळे अंतिमतः त्या स्वस्तच पडतात, असा अनुभव अनेक ग्राहकांचा असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनीही यंदा आपल्या दुकानांमधून चिनी वस्तूंची जागा भारतीय बनावटीच्या वस्तूंना दिल्याचे दिसून येते.