कर्नल के. सी. गुप्ते यांचे प्रतिपादन, लोकमान्य सोसायटीतर्फे ‘मराठा शौर्य दिन साजरा’

प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री ही देशातील एक जुनी रेजीमेंट आहे. इंग्रजांच्या काळापासून मराठा जवानांनी आपले शौर्य दाखविले आहे. पहिल्या महायुद्धापर्यंत या रेजीमेंटची हरहर महादेव अशी घोषणा होती. परंतु त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे शौर्य वाक्मय झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमामुळेच जवानांच्या नसानसात शौर्य संचारते असे उद्गार निवृत्त कर्नल के. सी. गुप्ते यांनी काढले.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या वतीने शुक्रवारी कोनवाळगल्ली येथील लोकमान्य रंगमंदीर येथे ‘मराठा शौर्य दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कर्नल के.सी. गुप्ते बोलत होते. व्यासपिठावर लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर वागळे, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, विठ्ठल प्रभू, सेवंतीलाल शहा, प्रभाकर पाटकर, सुबोध गावडे, नितीन कपिलेश्वरी व मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करी अधिकारी उपस्थित होते.
लोकमान्यतर्फे माजी लष्करी अधिकाऱयांचा सत्कार
लोकमान्य को-ऑप. सोसायटीतर्फे मराठा लाईट इन्फंट्रीतील माजी लष्करी अधिकाऱयांचा मराठा शौर्य दिनाचे औचित्य साधुन सन्मान करण्यात आला. कर्नल के. सी. गुप्ते, कर्नल ए. बी. जाधव, कर्नल विजय मिसाळ, कर्नल एच. डब्ल्यू मार्टीन, मेजर सदानंद शेळके, कर्नल सुभाष हेरवाडकर, कर्नल मॅक्सवेल रॉबर्ट यांचा लोकमान सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य सोसायटीमध्ये कार्यरत असणाऱया माजी सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला. कर्नल के. सी. गुप्ते यांच्या हस्ते भागवत गडवीर, शिवाजी पाटील, रमेश गौंडाडकर यांचा सन्मान करण्यात आला.
नितीन कपिलेश्वरी म्हणाले, शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य उभे केले ते आपल्या मावळय़ांच्या बळावर. वीर तानाजी मालुसरे यांनी दिलेल्या बलिदानामुळे कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला. त्यांचे ते बलिदान कायम स्मरणात रहावे या उद्देशाने मराठा शौर्य दिन साजरा केला जातो असे त्यांनी सांगत शिवाजी महाराजांच्या अनेक लढायांचे कथन केले.
प्रास्ताविक करताना संचालक पंढरी परब म्हणाले साहस आणि शौर्याच दुसर नाव म्हणजे मराठा लाईट इन्फंट्री. अडीचशे वर्षापासून हे रेजीमेंट यशाची शिखरे गाठत आहे. त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळेच आज आम्ही स्वतंत्र भारतात वावरत आहोत. लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून मागील 4 वर्षांपासून शौर्य दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव यांनी केले. कर्नल दीपक गुरूंग यांनी आभार मानले. यावेळे लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मराठा लाईट इंन्फट्रीतर्फे मराठा दिन उत्साहात
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने शुक्रवारी मराठा दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. 4 फेब्रुवारीलादेखील ऐतिहासिक महत्त्व असून या दिवशी 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून मराठा स्वराज्यात इतिहास रचला होता. त्यामुळे हा दिवस मराठा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
मराठय़ाचे प्रतीक छत्रपती शिवाजी यांच्या राजवटीतील पुणे जवळील सिंहगड म्हणून प्रसिद्ध असलेला कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. रेजिमेंट मराठा योद्धय़ांच्या वारशातून प्रेरणा घेते, जे गनिमी युद्धात पारंगत होते. मराठा लाईट इन्फंट्रीला शौर्य आणि बलिदानाचा मोठा इतिहास आहे. आणि भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या आणि सर्वात सुशोभित पायदळ रेजिमेंटपैकी एक आहे. आजपर्यंत रेजिमेंटने लढायामध्ये विजय मिळविल्याने 56 लढाई सन्मान, 28 शौर्य पुरस्कारांसह दोन व्हिक्टोरिया क्रॉस, चार अशोक चक्र, 10 परम विशिष्ट सेवा पदके, चार महावीर चक्र, चार कीर्ती चक्र, आठ मेन्शन-इन-डिस्पॅचेस आणि 10 थिएटर सन्मान, चार स्वातंत्र्यपूर्व आणि सहा स्वातंत्र्यानंतर सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
रेजिमेंटने क्रीडा, खेळ आणि साहसी उपक्रमामध्येही आपले कौशल्य दाखविले आहे. जिथे त्यांच्या खेळाडूंनी ऑलिंपिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि जागतिक स्पर्धांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली आहेत. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर हे सर्वोत्कृष्ट रेजिमेंट केंद्रांपैकी एक आहे. समकालीन आणि आधुनिक प्रशिक्षण पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करते. हा दिवस रेजिमेंटल सेंटरमध्ये सर्व रँकच्यावतीने मोठय़ा अभिमानाने साजरा केला.