
दत्ता शिरोडकर /पर्वरी
चैत्र महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये झाडे तसेच वेलींना आलेल्या विविध प्रकारच्या फुलांमुळे निसर्गाच्या सौंदर्यसृष्टीत भर पडली आहे.जणू स्वर्गातल्या अप्सरा विविध रंगाच्या साडय़ा परिधान करून पृथ्वीवर प्रगट झाल्या आहेत.
चैत्राच्या आगमनाने जणू ही फुले बहरली असून रणरणत्या उन्हात ही फुले रंगाची उधळण करीत असल्याचा भास आपल्याला होत आहे. एखादा अरसिकही हे दृश्य पाहताच एका वेगळय़ाच विश्वात हरवून जातो आणि आपला दिवसभरातला सर्व क्षीण विसरून जातो.
वृक्ष, वेलींवर आलेली चमकदार रंगाची सुंदर फुले बहरली असून चैत्र महिन्यामध्ये याच वृक्षांना बहार येत असल्यामुळे मनाला एक प्रकारचा आनंद मिळत आहे.उष्ण व दमट वातावरणात या वृक्षांची चांगली वाढ होत असल्यामुळे शेताच्या बांधावर,रस्त्यांच्या कडेला अशा विविध ठिकाणी ही फुललेले फुले पाहायला मिळत आहेत. मोगरा, चाफा,गुलमोहर ,पळस, आदी फुलांची झाडे फुलताना दिसत आहेत.रस्त्यावर अनेक झाडांची सावली सोबतीला आहे तसेच विविध फुलांची झाडेही बहरली आहेत.त्यात गुलमोहराच्या झाडाची लालभडक फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वाना या फुलांचे आकर्षण वाटत आहे.लाल,पिवळय़ा गुलाबी रंगाची ही फुले जणू उन्हाशी मैत्री करत गुजगोष्टी करत आहेत असा भास होत आहे.

सद्या उन्हाळा असल्याने ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.त्यात काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ घालत आहेत.अशी नानाविध जातीची फुले चैत्र व वैशाखात बहरतात.हिरव्यागार पानातून डोकावणारी फुले स्वतःच्या वेगळेपणाची साक्ष देत आहेत.याची अनुभूती ठीक ठिकाणी अनुभवायला मिळत आहे.
चैत्राच्या उन्हाने होरपळणाऱया जीवांना एखाद्या हिरव्यागर्द वृक्षाचे दर्शन होणे त्यातच हिरव्या पानांतून लालचुटुक फुलांचे डोकावणे मनाला आनंदीत करते.सृष्टीवर इतर वृक्षांची पानगळ होत असतानांच काही झाडे मात्र आपले अस्तित्व सांभाळून असतात.गुलमोहर आपल्या वैभवाची साक्ष देत रंगाची उधळण करतो.त्यांची पाने ,फुले याच दिवसात बहरून येतात.कुठे एखाद्या उजाड डोंगरमाथ्यावर हरवलेले एखादे रानफुल नजर वेधून घेते.निसर्गाची ही किमया उन्हाळय़ात अनेक फुलांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे.
पिवळा रंग हा नववधूचे प्रतिक असे मानतात आणि चैत्रच्या रणरणत्या उन्हात ‘ बहावा’ या झाडाला चमकदार पिवळय़ा रंगाची सुंदर फुले बहरताना दिसत आहेत. चैत्र महिन्यात या झाडाला बहार येतो आणि योगायोग असा कि या महिन्यात अनेक लग्न समारंभ होत असतात.जणू निसर्गानेच हा संयोग घडवून आणला असावा.उष्ण व दमट वातावरणात बारावा झाडाची चांगली वाढ होते .बाहावा फुललेली झाडे शहराच्या विविध भागात आढळून येतात. अशा या अल्हाददायक वातावरणात ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.हे निश्चित.