विद्यार्थी संघटनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल : पिडीत कुटूंबियांना जलदगतीने न्याय द्या,विद्यार्थी संघटनेतर्फे फोंडय़ात मेणबत्ती फेरीतून निषेध
प्रतिनिधी /फोंडा
भाजपा सरकारच्या कार्यकाळात राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णता झोपी गेलेली असून जनतेच्या आक्रोषाचे कोणतेचे सोयरसुतक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारला राहिलेले नाही. कळंगुट समुद्रकिनाऱयावर अर्धनग्न अवस्थेत मृत सापडलेल्या सिद्धी नाईक आणि तिच्या कुटूंबियांना जलदगतीने न्याय मिळवून द्यावा अशा घोषणेसह काल रक्षा बंधन दिवशी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली फोंडा शहरात मेणबत्ती निषेध फेरी काढण्यात आली.
एनएसयुआयच्या विद्यार्थी संघटनेतर्फे सिद्धी नाईक प्रकरणी सरकारच्या भूमिकेविषयी निषेध व्यक्त करताना क्रांती मैदानातून क्रांतीची ज्योत पेटवत क्रांतीचे पडघम वाजविले. पिडीत कुटूंबियांना न्याय मिळवा, आरोपींना कठोर शिक्षा केल्यानंतर क्रांतीज्योतीची धग थंडावण्यात येईल अशा इशारा विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी एहराज मुल्ला व पदाधिकाऱयांनी यावेळी दिला. मेणबत्ती निषेध फेरीची सुरवात भवानी सदर येथून करण्यात आली. शहरातून काढलेल्या फेरीचा क्रांती मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी क्रांती मैदान फोंडा येथे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राजेश वेरेकर, डॉ. केतन भाटीकर, ऍड. वरद म्हार्दोळकर, भानुदास नाईक यांनी सहभाग घेत तीव्र प्रतिक्रीया उमटून सरकारचा निषेध व्यक्त केला.
शांततापुर्ण गोवा महिलांवरील अत्याचारामुळे अशांत-दिगंबर कामत

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार निष्क्रीय झालेले असून कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. पोलिस आरोपींना अभय देत असून याला सरकारचा पुर्ण पाठिंबा असल्याचा संशय कामत यांनी व्य़क्त केला आहे. महिला व युवतीसाठी सुरक्षित ठिकाण असलेल्या गोव्यात यापुर्वी अशा घटना किंचीत घडत होत्या. सद्यपरिस्थितीत यावर कोणाचेच लक्ष नसून दरदिवशी अल्पवयीन युवतीवर बलात्काराच्या घटना घडत आहे. शांतातापुर्ण गोव्यात मडगांवात होणाऱया दामबाबाच्या गुलालोत्सवात आजपर्यंत अशाप्रकारची घटना घडली नसल्याचे त्यांनी नमूद केले. सिद्धी नाईक यांच्या आरोपीना शोधून काढावे
दिवसाढवळया घटनेलाही पालक जबाबदार-ऍड. वरद म्हार्दोळकर

ऍड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की सिद्धी नाईक हिच्या संशयास्पद मृत्यूचा तपासप्रकरणी गृहखाते निष्क्रीय ठरलेले आहे. सरकारी यंत्रणे जलदगतीने तपास लावणे गरजेचे होते. युवतीवर रात्री होणाऱया अत्याचारासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालकांनी जबाबदारी घ्यावा असे ठणकावले, सदर घटनेसंबंधी मयत युवतीचे वडील तिला गिरी म्हापसा येथे बसस्थानकावर सोडून गेले होते. त्यानंतर दिवसाढवळय़ा घडलेल्या घटनेत चूक कोणाची याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज प्रत्येक पालकांनी जाब विचारणे गरजेचे असल्याचे ऍड वरद म्हार्दोळकर म्हणाले.
गोवा राज्य आज मुक्तीदिनाची हिरकमहोत्सवी साजरी करीत आहे. त्य़ा पार्श्वभूमीवर जनतेला आजही सुरक्षितता प्रदान करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱयावर जलदगतीने कारवाई करावी अन्यथा येत्या निवडणूकीत घरी बसण्याची तयारी ठेवावी असा इशारा विद्यार्थी संघटनेचे नौशाद यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिला.
सरकारने आरोपींची पाठराखण करते काय?-डॉ. केतन भाटीकर

डॉ. केतन भाटीकर म्हणाले की गोव्यात काही वर्षापासून घडलेल्या स्कार्लेट प्रकरणी अद्याप पिडीत कुटूंबियांना न्याय मिळालेला नाही. राज्य सरकार भरमसाठ दरवाढ करूनही सामान्य जनतेसाठी सुरक्षितता प्रदान करू शकत नाही. हा पैसा केवळ आमदार भाजपात आयात करण्यासाठी उपयोगात आणला जातो का ? तेव्हा जनतेने विचार करणे गरजेचे आहे. सरकार कोणाला अभय देऊ इच्छीते, पोलिसांनी शवचिकीत्सा अहवाल करण्यासाठी घाई केली, सदर प्रकरण घाईगडबडीत उकरण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव आला होता असा प्रश्न डॉ. केतन भाटीकर यांनी केला.
सरकार निष्क्रीय, जनतेचा आक्रोष, मुख्यमंत्री निवांत-राजेश वेरेकर

राजेश वेरेकर म्हणाले की रक्षा बंधनाच्या दिवशी मेणबत्ती निषेध फेरी सहभागी होऊन विद्यार्थी संघटनेनी पिडीत कुटूंबियांची वेदना जाणलेल्या आहे. महिलांना मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेला गोवा आज अशा वारंवार घटनेमुळे अशांत झालेला आहे. संवेदना नसलेल्या भाजपा सरकार संशयित आरोपींना धारेवर धरण्याऐवजी पिडीत कुटुंबियांना त्रास करण्याचे धोरण राबविलेले आहे. आज भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले असून जनता न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र निवांत आहे, त्यामुळे आजच्या घडीला कोणती भूमिका घ्यावी हे सुजाण जनतेने ठरवावे असे राजेश वेरेकर म्हणाले.