प्रतिनिधी/ बेळगाव
शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या हिडकल जलाशयामधून आणखी 6 एमजीडी जादाचे पाणी उपसा करण्यासाठी नवीन विद्युत पंप बसविण्याच्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोना आणि पावसामुळे कामात अडथळा निर्माण झाल्याने काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. पण येत्या काही दिवसात काम पूर्ण करून शहराला लवकरच जादाचे पाणी मिळण्याची शक्मयता आहे.
शहराची व्याप्ती वाढत असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही. राकसकोप आणि हिडकल जलाशयांमधून पाणी उपसा करून शहरवासीयांची तहान भागविली जाते. शहरवासीयांसाठी पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून आणखी 6 एमजीडी पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव तयार करून याची अंमलबजावणी पाणीपुरवठा मंडळाने केली आहे. हिडकल जलाशयामधून शहराला दररोज 9 ते 10 एमजीडी पाणीपुरवठा केला जातो. हिडकल ते बेळगाव 56 कि. मी. चे अंतर असून, 3 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. ही योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी उपलब्ध निधीअंतर्गत ही योजना राबविण्यात आली होती. 18 एमजीडी पाणी उपसा करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे आणखी 6 एमजीडी जादाचे पाणी बेळगावकरिता आणण्यासाठी योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. हिडकल जलाशय, तुम्मरगुद्दी आणि कुंदरगी अशा तीन ठिकाणी असलेल्या विद्युत पंपांची क्षमता वाढविण्यात आली आहे. याकरिता 32 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुणे येथील कंपनीकडून विशेष पंप तयार करवून घेण्यात आले आहेत. हे पंप बेळगावात दाखल झाले असल्याने बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. विद्युत पंपांसाठी विद्युत पुरवठय़ाची क्षमता वाढविण्यात आली असून नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. विद्युत पंप बसविण्यास प्रारंभ करण्यात आल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहराला हिडकल जलाशयामधून आणखी 6 एमजीडी पाणी मिळणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे विद्युप पंप बसविण्याचे काम रखडले होते. पुणे आणि विजापूर परिसरातील कामगार असल्याने सदर कामात अडथळा निर्माण झाला होता. आता या कामास पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. हिडकल डॅम जॅकवेल, कुंदरगी आदी ठिकाणाच्या पंपिंग स्टेशनमधे जादा क्षमतेचे विद्युप पंप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. तुम्मरगुद्दी पंपिंग स्टेशनमधील पंप बसविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मात्र उर्वरित काम पूर्ण करण्यास कोरोना आणि पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. उर्वरित काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरच हिडकल जलाशयामधून जादाचे पाणी उपसा करण्यास प्रारंभ होण्याची शक्मयता आहे.