10 जणांवर कारवाई : तिघांना अटक : 16 हजारांची रोकड जप्त
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कराड, वाई, वडूज, दहिवडी, कोरेगाव व फलटण येथे पोलिसांनी आठ मटका अड्डय़ांवर छापे टाकून दहाजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी वाई व कराड पोलिसांनी तिघांना अटक केली असून या छाप्यांमध्ये पोलिसांनी 16 हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी या कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये कराड शहरात गुरुवार पेठेतील एका पानशॉपच्या आडोशाला मटका चालवणाऱया वसीम इकबाल मुल्ला (वय 34, रा. गुरुवार पेठ) या अटक करत त्याच्या ताब्यातील एक हजार 245 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. वाई पोलिसांनी सिध्दनाथवाडीत छापा टाकून शहाजी संजय घाडगे (वय 28) व फुलेनगर) येथे छापा टाकून सुनील नारायण सपकाळ (वय 42, रा. रविवार पेठ, वाई) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील 2 हजार 670 रुपये रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.
वडूज पोलिसांनी कातरखटाव येथे मटका चालवणाऱया राहूल भीमराव नलवडे (वय 30 रा. बोंबाळे, ता. खटाव) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्या ताब्यातील 2 हजार 260 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. फलटण शहर पोलिसांनी अभिजित बारशेजारी मोकळय़ा जागेत मटका चालवणाऱया सुनील मोतीराम पवार (वय 38, रा. बुधवार पेठ, फलटण) व रविवार पेठेत मटका चालवणाऱया सूरज दिलीप काकडे (वय 32 रा. मंगळवार पेठ, फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातील 2 हजार 70 रुपये रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. कोरेगाव पोलिसांनी आझाद चौकात भाजी मंडईनजिक पत्र्याच्या शेडमध्ये मटका चालवणाऱया अरुण विश्वनाथ खरात (वय 62, रा. महादेवनगर, कोरेगाव व शाहरुख काझिरा रा. जुनीपेठ, कोरेगाव) यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 7 हजार 202 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. तर दहिवडी पोलिसांनी बसस्थानकाजवळ मटका चालवणाऱया दीपक मोहन अवघडे (वय 25 व नासीर बशीर मुल्ला (दोघे रा. दहिवडी) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडील 575 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी 7 जणांना सीआरपीसी अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या असून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.