मे महिन्याची उन्हाची दाहकता संपली की मोसम बदलतो आणि अवघ्या सृष्टीला नव उन्मेशाचे अंकुर फुटतात. पावसाची चाहूल लागते. नांगरुन तापलेली जमीन मशागत करुन पेरणीसाठी सज्ज केली जाते. पण गतवर्षी आणि यंदा कोरोनाने अवघ्या मानव समूहाला जो तडाखा दिला किंवा अजूनही दिला जातो आहे तो लक्षात घेतला तर बरेच समजून येईल. कुठे चुकते आणि काय सुधारले पाहिजे हे कळाले आणि माणूस म्हणून माणसासारखे आपणा सर्वांना जगता आले तर ते आनंददायी होईल. पावसाच्या आनंदसरी कोसळत असताना आणखी एक आनंददायी घटना घडते आहे आणि ती म्हणजे कोरोनाची दुसरी लाट देशात आणि महाराष्ट्रात ओसरते आहे. कर्नाटक व गोव्यातही लाटेचा जोर ओसरला आहे. कोरोना विरुद्धची लढाई वाटते तितकी सोपी नाही. अनेकांची त्रेधातिरपिट उडाली आहे. आपण पण देश म्हणून या लढाईत उतरलो आहोत. सर्वांचे लसीकरण आणि या संकटातही संधी शोधून काही नवे चांगले आणि भारत देशाला समृद्ध करण्याचे प्रयत्न होत आहेत. राजकारण आणि राजकीय टीका-टिपण्णी सुरु राहणारच. पण पावसाच्या आनंदसरी सोबत दोन वार्ता आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे आणि राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून शिथिल होत आहेत. टप्प्याटप्प्याने सारे जनजीवन सुरळीत आणि अनलॉक करुन पूर्ववत करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. लालपरी अर्थात सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी उपयुक्त परिवहन सेवेची गाडी जिल्हा अंतर्गत व आता राज्यात धावणार आहे. त्यासाठीची तयारी झाली आहे. पहिली लाट संपली आणि आपण असाच मोकळा श्वास घेत रस्त्यावर आलो आणि कोरोनाची महाभयंकर दुसरी लाट आली. हा महाभयानक अनुभव आपण घेतला आहे. या दुसऱया लाटेत अनेकांचे जीव गेले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांचे उद्योग-व्यवसाय बंद पडले. नोकऱया गेल्या, स्थलांतर झाले. एक ना दोन. संकटामागून संकटे आणि तडाख्या मागून तडाखे. त्यामुळे लाट ओसरत असली तरी कोरोनासाठीची शिस्त ओसरता कामा नये. कोरोनाची भीती कायम राहणार आहे. आता आपण सर्वांना नवी आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी लागणार आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. स्वच्छता आणि काळजीपूर्वक व्यवहार आणि पर्यावरणपूरक वर्तणूक याला पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे. देशात कोरोनाचा संसर्ग दर साडे एकवीस टक्के होता तो घटून साडेसहा टक्क्यावर आला आहे. रुग्ण संख्याही कमी होते आहे. कोरोनाबाधित बरे होत आहेत. सक्रीय रुग्णसंख्या झपाटय़ाने घसरत आहे. हा सारा आनंदाचा भाग असला तरी धोका कायम आहे आणि म्हणूनच अखंडपणे सावध राहिले पाहिजे. जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष. शाळा, महाविद्यालये यांचे प्रारंभ पण अजूनही त्या क्षेत्रात कोरोनाची दहशत आहे. एक म्हणजे तिसरी लाट येणार व ती लहान मुलांना फटका देणार असे बोलले जाते आहे, सांगितले जाते आहे. त्या सांगण्याला काय आधार हे कळत नाही. पण भीती कायम आहे. दहावी, बारावी परीक्षांचे घोळ झाले आहेत. आता नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरु होणार, केव्हा होणार आणि कुणाला कसे प्रवेश मिळणार हे बघावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रातही पिपासूवृत्ती आणि बाजारु प्रवृत्ती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनानंतरचे जग आणि भारत कसा असेल ते बघावे लागेल. पण पुढची लाट लहान मुलांत आणि कोरोना रूप बदलतो आहे. या चर्चेची भीती किंवा दहशत कायम आहे. ओघानेच शाळा सुरु करणे असो, पंढरीची पायी वारी असो, विठ्ठल दर्शन असो अथवा लग्न समारंभ, अधिवेशने वा आंदोलने असोत ती महागात पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय तप्त आहे. मोर्चे, आंदोलने यांची रणवाद्ये वाजत आहेत. राजकारणात नव्या सोयरिकी आणि नवी पावले टाकण्याचे मनसुबे समोर आले आहेत. स्वबळाची आणि पाठीत खंजीर वगैरे भाषा नेत्यांनी सुरू केली आहे. राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशनात कसे व केव्हा होणार हा सुद्धा प्रश्न आहे. पण या साऱया दडपणातही पाऊस वेळेवर आला. येणार आणि आनंदसरी महाराष्ट्रात, देशात बरसत आहेत याचा अधिक आनंद आहे. लसीकरणाला वेग द्यायला हवा आणि बळीराजाला खरिप यशस्वी करण्यासाठी बळ द्यायला हवे. आज घडीची ती गरज आहे. वय वर्षे 18 ते 45 या युवा पिढीला लस मिळालेली नाही. भारत हा युवकांचा देश आहे. या युवा पिढीचे रक्षण व संवर्धन केले पाहिजे. न्यायालयानेही त्यासाठी सरकारचे कान टोचले आहेत. आता मोठय़ा संख्येने लस उपलब्ध होणार असे सांगितले जाते आहे. 130 कोटी लोकांना लस देणे वाटते तितके सोपे नाही. पण हे करण्यावाचून पर्याय नाही. रेमडेसीव्हरचा आणि कोरोना उपचारांचा जो काळा बाजार झाला तसा लसीकरणात होता कामा नये. संकटात कुणी कुणाच्या टाळूवरचे लोणी खाऊ म्हणत असेल तर कठोरपणे त्यावर कारवाई व्हायला हवी. आणि टाळूवरचे लोणी खाणाऱयांचे दात पाडले जावेत. देशवासियांना लवकरात लवकर व शक्यतो मोफत उत्तम लस दिली जावी. लसीसंदर्भाचे निकष सतत न बदलता एकदाच ठामपणे घेतले जावेत आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी. मोदी सरकारने शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहीरनाम्यातच म्हटले आहे. आता लसीकरण आणि कृषीला अर्थात बळीराजाला सर्व ते सहकार्य करून नेटकी पावले टाकली तर ती अर्थव्यवस्थेसाठी योग्य पेरणी ठरेल आणि शेतीतून समृद्धी व रोजगार याचबरोबर अर्थव्यवस्था बळकट होईल. ‘जून का महिना’ काही देऊ पाहतो आहे. ते स्वीकारले पाहिजे आणि कोरोनाच्या या लढाईत निर्णायक विजयासाठी पावले टाकली पाहिजेत.
Previous Articleजलमंदिर पॅलेस येथे शिवराज्यभिषेक दिन शाही पद्धतीने साजरा
Next Article सरकारने तत्काळ अधिवेशन बोलवावे
Related Posts
Add A Comment