ऍडव्हान्स रक्कम परत न केल्याच्या रागातून कृत्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
ऊस तोडणीसाठी ऍडव्हान्स देवूनही कामावर न येणाऱ्या मजूरास ट्रॅक्टर चालकाने ऊसतोड मजूरास घरात घुसून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये सरदार गणपती मोहीते (वय 35 रा. मातंग वसाहत, सांगरुळ ता. करवीर) या ऊसतोड मजूराचा मृत्यू झाला. मृत मोहितेच्या नातेवाईकांनी भरत पुंडलीक खाडे (रा. सांगरुळ) याने ही मारहाण केल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती सरदार गणपती मोहीते हा सांगरुळ येथे आई, पत्नी, व मुलीसह राहतो. तो ऊस तोडणीचे काम करतो. त्याने गेल्या वर्षी भरत खाडे या ट्रॅक्टर चालक- मालकाकडून 20 हजार रूपये ऊसने घेतले होते. हे पैसे फेडण्यासाठी त्याने भरत खाडे याच्याकडे कामास येतो असे सांगितले होते. मात्र गेले वर्षभर सरदार मोहीते कामास आला नाही. याचदरम्यान त्याने गावातील आणखी एकाकडून ऍडव्हान्स स्वरुपात पैसे घेतले होते.
ऊस तोड सुरु झाल्यानंतर सरदार मोहिते भरत खाडे याच्यासह अन्य एकाकडे ऊसतोडणीसाठी जात होता. मात्र भरत खाडे याने 15 दिवसांपूर्वी तु माझे पैसे परत दे नाहीतर फक्त माझ्याकडेच काम कर असे सांगून सरदार मोहीतेस मारहाण केली. यामध्ये सरदार मोहीत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
शुक्रवारी दुपारी सरदार मोहिते घरामध्ये विश्रांती घेत असताना भरत खाडे याने घरामध्ये घूसुन त्याला तु माझ्याकडेच कामा ये नाहीतर माझे पैसे परत दे असे सांगत वाद केला. या वादातून चिडून भरत खाडे याने सरदार मोहितेस जबर मारहाण केली. लाथाबुक्या व काठीने केलेल्या मारहाणीत सरदार मोहिते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नातेवाईकांचा सीपीआर आवारात ठिय्या
मारहाणीत सरदार मोहिते याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगरुळ मातंग वसाहत येथे वाऱ्यासारखी पसरली. यानंतर गावातील नागरीकांनी सीपीआर रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संशयीत आरोपी भरत खाडे यास अटक केल्याशिवाय सीपीआर रुग्णालयातून मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान रात्री उशिरा पर्यंत मोहिते कुटूंबियांचे जबाब घेण्याचे काम सुरु होते.