आसाम विधानसभा निवडणुकीत यंदा मुस्लीमबहुल भागांमध्ये बंपर व्होटिंग (मतदान) दिसून आले आहे. बदरुद्दीन अजमल यांचा ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फंट या मतांवर स्वतःचा दावा करत आहे. आसाममध्ये एकूण मतदारांपैकी 35 टक्के मतदार मुस्लीम आहेत. यंदाच्या निवडणुकीत डी (डाउटफुल व्होटर लिस्ट) व्होटर होण्याच्या भीतीनेही मुस्लीमबहुल भागांमध्ये अधिक मतदानाचा पॅटर्न दिसून आल्याचे मानले जात आहे.
आसाममध्ये एकूण 126 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 34 ठिकाणी सर्वाधिक मुस्लीम मतदार आहेत, अशा मतदारसंघांमध्ये 84 टक्के मतदान झाले आहे. तर उर्वरित 92 मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारसंघांची संख्या नसल्यात जमा असून तेथे सरासरी मतदान 79 टक्के झाले. राज्याचे सरासरी मतदान 82 टक्के राहिले आहे. पण मुस्लीम मतदारांचे प्रमाण अधिक असलेल्या 7 मतदारसंघांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
2016 च्या निवडणुकीत मुस्लीमबहुल 10 जागांपैकी 4 ठिकाणी काँग्रेसने विजय मिळविला होता. तर एआययुडीएफने 6 जागा जिंकल्या होत्या. मतदानाच्या दिवशी मुस्लीम मतदार नेहमीच अन्य समुदायांच्या तुलनेत अधिक प्रमाणात बाहेर पडतात, कारण ते पक्ष आणि उमेदवारांमुळे अधिक प्रभावित असतात असे अल्पसंख्याक विद्यार्थी नेता आणि आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाचे सल्लागार अजीजूर रहमान यांनी म्हटले आहे. अन्य लोकांच्या उलट मुस्लीम (बंगाली भाषिक स्थलांतरित) कमी शिकलेले आणि गरीब असून ते सामूहिक स्वरुपात स्वतःचा निर्णय घेतात. ते घाबरलेले असतात. मतदान न केल्यास आपले नाव डी लिस्टमध्ये जाण्याची भीती त्यांनी सतावत होती असा दावा रहमान यांनी केला आहे.
डी व्होटर म्हणजे काय
मतदार यादीच्या पडताळणीदरम्यान डी व्होटर किंवा डाउटफुल व्होटरच्या स्वरुपात काही मतदारांची ओळख पटविण्यात आली आहे. अशा लोकांचे प्रकरण फॉरेनर्स ट्रायब्युनलमध्ये सुरू आहे किंवा लवादाने त्यांना विदेशी नागरिक घोषित केले आहे. पण डी व्होटर एनआरसीत स्वतःचे नाव सामील करण्यासाठी अर्ज करू शकतात. फॉरेनर्स ट्रायब्युनलकडून हिरवा कंदील मिळाल्यावर आणि डी व्होटरच्या स्वरुपात नोंद नाव हटविल्यावरच त्यांची नावे एनआरसीत नोंद होऊ शकतात.